मतदार जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:23+5:30
जिल्ह्यात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली.

मतदार जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदारांना निवडणुक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. यातूनच आपली लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होईल, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा स्वीप समितीचे सदस्य सचिव डॉ.मोहित गर्ग यांनी केले.
जिल्ह्यात मतदार जनजागृतीबाबत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वीप समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या कृती आराखड्यावर चर्चा झाली. यावेळी मे म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांना मतदान प्रक्रिया व मतदान करण्याचे फायदे सांगावे लागतील. प्रत्येक विभाग व शाळा महाविद्यालयांचे योगदान या जनजागृती कार्यक्रमात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक उपस्थित सदस्यांकडून विविध नियोजन व संकल्पना घेतल्या. विधानसभा निवडणुकासाठी आवश्यक प्रचार प्रसार साहित्य जिल्हा स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या अभियानात माध्यमांचे महत्वाचे स्थान आहे. पारदर्शक निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी माध्यमांनी मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगणे गरजेचे आहे.
या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रूढे, उप प्रदेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस. एच. पेंदाम, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक पी. एम. भोसले, नाबार्डचे डीडीएम आर. जी. चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिन अडसुळ, महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडंगे, सहा.स्वीप नोडल अधिकारी सागर पाटील, सदस्य कृष्णा रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते.
कलापथक, बॅनरद्वारे जागृती
या बैठकीत मतदार जनजागृतीबाबत बॅनर्स, पोस्टर्स, संकल्पपत्र, कलापथक कार्यक्रम, एसएमएस, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, प्रभात फेरी, रक्तदान शिबीर, गृहभेटी असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत लेखी सूचना या अगोदर दिल्या आहेत. प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम व प्रक्रियेबाबत मतदारांना माहिती देण्यासाठी आवश्यक सुचना दिलेल्या आहेत.
दुर्गम भागात जागृतीवर प्रशासनाचा भर
दुर्गम व आदिवासी बहुल भागांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. जागृतीनंतर या भागातील नागरिक मतदानाचा हक्क हमखास बजावितात.