वर्चस्वासाठी सर्व राजकीय पक्ष सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 02:02 IST2017-01-26T02:02:11+5:302017-01-26T02:02:11+5:30

चामोर्शी पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष, आघाडी साऱ्याच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

All political parties have come to the fore | वर्चस्वासाठी सर्व राजकीय पक्ष सरसावले

वर्चस्वासाठी सर्व राजकीय पक्ष सरसावले

चामोर्शी पंचायत समिती निवडणूक : काँग्रेस, राकाँ, भाजप, शिवसेना व अपक्षांच्या आघाड्यांकडून मोर्चेबांधणी
रत्नाकर बोमिडवार  चामोर्शी
चामोर्शी पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष, आघाडी साऱ्याच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारांची शोधाशोध करताना काहींची जास्तच दमछाक होत आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असल्यामुळे भाजपाकडे उमेदवारांचा ओघ अधिक असल्याने अनेक जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपात प्रचंड चुरस दिसून येत आहे.
चामोर्शी पंचायत समितीसाठी १८ गण असून त्यापैकी ५ क्षेत्र सर्वसाधारण, ३ सर्वसाधारण महिला, २ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ३ क्षेत्र नामाप्र महिला, २ जागा अनुसूचित जमाती महिला, १ क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी, १ क्षेत्र अनुसूचित जाती व १ क्षेत्र अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पंचायत समिती सभापतीचे पद नामाप्रसाठी राखीव आहे. पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यासाठी सारेच राजकीय पक्ष व नेते सरसावले आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालय व नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले. तर काही पक्षांनी उमेदवारांसाठी लाल गालीचे अंथरले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले आहे.
कुनघाडा (रै.) पं. स. क्षेत्र सर्वसाधारण जागेसाठी असून भाजपाकडे माजी उपसभापती व भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, उमेश कुकडे, रवींद्र चलाख यांनी उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. काँग्रेसतर्फे धर्मराव चापडे हे उमेदवार राहू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुरलीधर उडाण व प्रभाकर चापडे यांनी उमेदवारी मागितली आहे. तळोधी (मो.) क्षेत्र देखील सर्वसाधारण असून भाजपाकडे रामचंद्र सातपुते, सुभाष वासेकर, विजय सूरजागडे, हितेश कुनघाडकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँगे्रसने उमेश सातपुते यांना समोर केले असून राकाँतर्फे दिनेश सूरजागडे, दिनकर दुधबळे, श्रीकांत सातपुते किंवा अशोक वासेकर यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. विसापूर (रै.) क्षेत्र अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून भाजपतर्फे रेखा नरोटे, काँग्रेसतर्फे गौराबाई गडवे यांची नावे चर्चेत आहे. कुरूड मतदार संघ नामाप्र महिलेसाठी राखीव असून भाजपाकडे शारदा गट्टीवार, उषा सातपुते व विद्या बोदलकर यांनी उमेदवारी मागितली आहे.
काँग्रेसतर्फे रेखाबाई सोमनकर यांचे नाव चर्चेत आहे. राकाँकडे रंजना काशिनाथ जुआरे व छाया देवराव समर्थ यांनी दावेदारी केली आहे. विक्रमपूर क्षेत्र सर्वसाधारण असून भाजपाकडे विष्णू ढाली, बिधान रॉय यांनी उमेदवारी मागितली असून काँग्रेसकडे रंजीत शील, विक्रम बेपारी, अनिल अधिकारी यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. फराडा क्षेत्रासाठी भाजपाकडे संगीता भोयर व सोनी शेंडे यांनी उमेदवारी मागितली असून काँग्रेसतर्फे मंजूषा विष्णू बोरूले यांचे नाव चर्चेत आहे.
भेंडाळा क्षेत्र अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून भाजपाकडून करूणा लोमेश उंदीरवाडे, काँग्रेसतर्फे धर्मशीला सहारे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मुरखळा क्षेत्र नामाप्र महिलेसाठी राखीव असून भाजपतर्फे अल्का देवीदास तुंबडे व काँग्रेसतर्फे कल्पना कुकुडकर यांची नावे चर्चेत आहेत. लखमापूर बोरी क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव असून भाजपाकडे भाऊराव डोर्लीकर, ईश्वरदास चुनारकर यांनी तर काँग्रेसकडे अनिल गोलीवार, विलास खोब्रागडे यांनी उमेदवारी मागितली आहे.
गणपूर क्षेत्र नामाप्रसाठी राखीव असून येथे भाजपातर्फे रामदास हुलके, काँग्रेसतर्फे अनिल हुलके यांची नावे चर्चेत आहेत. हळदवाही क्षेत्र अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून भाजपातर्फे चंद्रकला आत्राम तर काँग्रेसकडून कल्पना रघुनाथ कुलेटी उमेदवार राहू शकतात. रेगडी क्षेत्र सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून येथे भाजपातर्फे प्रीती बिश्वास, काँग्रेसतर्फे सावित्री घरामी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. घोट क्षेत्र सर्वसाधारण असून येथे भाजपाकडे विलास गण्यारपवार तर काँग्रेसकडे माधव घरामी यांनी उमेदवारी मागितली आहे.
सुभाषग्राम क्षेत्र सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भाजपातर्फे आकुलीबाई बिश्वास, काँग्रेसतर्फे रंजिता परिमल रॉय उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दुर्गापूर क्षेत्र नामाप्र महिलेसाठी राखीव असून भाजपातर्फे वनीता विनोद गौरकार, काँग्रेसतर्फे चंद्रकला झाडे तर राकाँतर्फे बेबी बकाले व रेखा पिदुरकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. वायगाव क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव असून येथे भाजपातर्फे विनोद कवडू मडावी, काँग्रेसकडून आनंदराव कोडापे तर राकाँकडून देवा कुमरे उमेदवार राहू शकतात. आष्टी क्षेत्र नामाप्रसाठी राखीव असून भाजपाकडे बंडू कुंदोजवार, वतीश चहारे यांनी उमेदवारी मागितली आहे. तर काँग्रेसतर्फे विनय येलमुले व प्रमोद येलमुले यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहे. इल्लूर हे सर्वसाधारण क्षेत्र असून भाजपाकडे विजय आकेवार, काँग्रेसकडे शंकर आक्रेडीवार व मारोती भोयर यांनी उमेदवारी मागितली आहे.
याशिवाय शिवसेना दमदार उमेदवारांच्या शोधात असून अतुल गण्यारपवार हे आपल्या आघाडीतर्फे तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. चामोर्शी पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Web Title: All political parties have come to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.