नव्या प्रभारींच्या दौऱ्याला काँग्रेसचे सर्व नेते आले एकत्र
By Admin | Updated: June 25, 2016 01:17 IST2016-06-25T01:08:13+5:302016-06-25T01:17:24+5:30
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यातील सर्व मतभेद विसरून शुक्रवारी गडचिरोली येथे काँग्रेसच्या भवनात एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.

नव्या प्रभारींच्या दौऱ्याला काँग्रेसचे सर्व नेते आले एकत्र
जिल्हास्तरावर बैठक : पक्ष एकसंघ असल्याचे प्रदर्शन
गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यातील सर्व मतभेद विसरून शुक्रवारी गडचिरोली येथे काँग्रेसच्या भवनात एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नव्यानेच गडचिरोली जिल्ह्यात नियुक्त केलेल्या पालकप्रतिनिधींच्या आगमनाचे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालक प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून नागपूरचे सुरेश भोयर व डॉ. योगेंद्र भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या प्रथम आगमनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश इटनकर, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख विनोद दत्तात्रय आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे तालुकास्तरावरील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपप्रणित राज्य सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, बेरोजगार देशोधडीला लागले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. विद्यमान सरकार हे भ्रष्ट असल्याने लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. त्या दृष्टीने काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या फसव्या घोषणा व विकासात्मक दृष्टीकोण असलेली काँग्रेसची विचारधारा गावागावात पोहोचवावी, असे आमदार वडेट्टीवार म्हणाले. याप्रसंगी युकाँचे पंकज गुड्डेवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मितेश राठोड, सुनील खोब्रागडे, नरेंद्र भरडकर, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
गटबाजी संपुष्टात आणून निवडणुका लढवू
गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर काँग्रेसच्या शाखा व समित्या स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका व जिल्हा कार्यकारीणी गठित करण्यात येणार आहे. यापुढे काँग्रेस पक्षात गटातटाचे राजकारण होणार नाही. काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.