Alcohol and tobacco are only possible through women | दारू-तंबाखूमुक्ती महिलांमुळेच शक्य

दारू-तंबाखूमुक्ती महिलांमुळेच शक्य

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : जिल्ह्यातील दारूबंदीसाठी १९८७ पासून सुरू झालेल्या आंदोलनात चामोर्शी तालुका सुरुवातीपासूनच सक्रिय होता. कारण येथील लोकांना दारूबंदी हवी होती. महिलांचा या आंदोलनात पुढाकार होता. त्यामुळे शासनावर दबाव वाढून १९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी लागू झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झालेल्या मुक्तिपथ अभियानाने या दारूबंदीला बळ दिले. या अभियानात सहभागी झालेल्या चामोर्शी तालुक्यातील महिला दारूबंदीसाठी संघर्ष करीत आहेत. तब्बल ८९ गावांतील महिलांनी विक्री बंद केली आहे. त्यामुळे आमचा पद्मश्री पुरस्कार अशाच धाडसी महिलांचा व गाव संघटनांचा आहे, असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी केले.
मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सदस्य उषाताई सातपुते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.
डॉ. अभय बंग म्हणाले, राज्यातच नाही तर देशातही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आपण वारंवार ऐकतो. या घटनांमध्ये एक साम्य आढळते. हिंसा करताना आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे हे हिंसाचार थांबवायचे असेल तर दारुला नाही म्हणणे आवश्यक आहे. चामोर्शी तालुक्याच्या ८९ गावांनी ही हिम्मत दाखवली आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, दारूबंदीसाठी असलेली तळमळ या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ही गावे आणि येथील महिला व पुरुष अभिनंदनास पात्र आहेत, असे बंग म्हणाले. चामोर्शी तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, जितेंद्र कुनघाडकर यांनी संपूर्ण संमेलनाचे यशस्वी नियोजन केले.७२ गावांतील ३३७ महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.

खºर्याचे भूत उतरवणे गरजेचे
दारूबंदीसाठी गावागावातील महिलांचा संघर्ष सुरूच आहे. पण खर्रा या पदार्थाचे व्यसन सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. पुरुषांसोबतच स्त्रिया आणि लहान मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यातून पानठेलाधारकांचे घर भरते पण या बदल्यात जिल्ह्यातील लोकांना तोंडाचा कॅन्सर, लकवा, रक्तदाब असे आजार मिळतात. खर्रा या विषारी पदार्थाचे भूत उतरवून त्याची सवय सोडणे गरजेचे आहे असे डॉ. बंग म्हणाले.

यात्रा तंबाखूमुक्त करू
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्र्कंडादेव मंदिर चामोर्शी तालुक्यात आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही जत्रा मुक्तिपथ, मार्र्कंडा येथील गावकरी, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दारू आणि तंबाखूमुक्त केली आहे. यंदाही ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करायची असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Alcohol and tobacco are only possible through women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.