आलापल्ली मसाहत विकासापासून वंचित
By Admin | Updated: January 25, 2015 23:15 IST2015-01-25T23:15:26+5:302015-01-25T23:15:26+5:30
आलापल्ली मसाहत स्थानिक राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे मार्र्कंडा (कं.) ग्रामपंचायतीला जोडण्यात आली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे दोन्ही ग्रा. पं. नी पाठ फिरविली.

आलापल्ली मसाहत विकासापासून वंचित
आष्टी : आलापल्ली मसाहत स्थानिक राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे मार्र्कंडा (कं.) ग्रामपंचायतीला जोडण्यात आली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे दोन्ही ग्रा. पं. नी पाठ फिरविली. परिणामी या भागातील विकासकामे मागील सात वर्षांपासून रखडलेली आहेत. आलापल्ली मसाहतीला स्वतंत्र ग्रा. पं. चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चंद्रपूर-सिरोंचाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या एका बाजूला आलापल्ली मसाहतीचा एक भाग आहे.
या भागातील नागरिकांना सोयी- सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष आहे. लोकायुक्त मुंबई यांच्या निर्णयानुसार हा भाग मार्कंडा (कं.) या गावाला जोडण्यात आल्याचे पत्र ग्रा. प. ला प्राप्त झाल्याने मार्कंडा (कं.) ग्रा. पं. ने मागील वर्षापासून आलापल्ली मसाहत या भागातील घर टॅक्स वसूल करणे सुरू केलेले आहे. मागील निवडणुकीमध्ये या भागातील नागरिकांनी मार्र्कंडा ग्राम पंचायत अंतर्गत मतदान केले. मात्र एकाही लोकप्रतिनिधीने या भागाच्या समस्या जाणून घेतल्या नाही. परिणामी मागील अनेक वर्षांपासून येथील विकास कामे रखडलेली आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार या भागातील लोकसंख्या ६०० च्या आसपास होती. आता ही लोकसंख्या ७०० च्या वर गेली आहे. त्यामुळे आलापल्ली मसाहत हा वेगळा वार्ड निर्माण करण्यात यावा, किंवा आलापल्ली मसाहतीला स्वतंत्र ग्रा. पं.चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आलापल्ली मसाहत हा आष्टीचा भाग मार्र्कंडाला जोडल्यामुळे ग्रा. पं. ने विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासदार-आमदारांनी लक्ष घालून ग्राम विकासमंत्र्यांकडे सदर बाब लक्षात आणून द्यावी व मसाहत आष्टी ग्रा. पं. ला जोडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)