सव्वाशेवर विवाहांचा हुकला अक्षय तृतीयेचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:48+5:302021-05-12T04:37:48+5:30
गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा ...

सव्वाशेवर विवाहांचा हुकला अक्षय तृतीयेचा मुहूर्त
गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा काेराेना संसर्गामुळे विवाह साेहळे प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नियाेजित केलेले जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. हे विवाह कार्य दिवाळीदरम्यान ऑक्टाेबर महिन्यात हाेण्याची शक्यता आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. गडचिराेली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अधिकाधिक विवाह साेहळे पार पाडले जातात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात व शहरी भागात काही ठिकाणी सामूहिक विवाह साेहळेही आयाेजित केले जातात. मात्र, यंदा काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लाेकांच्या उपस्थितीत व काेविडचे नियम पाळून दाेन तासाच्या आत लग्नकार्य आटाेपावे लागत आहे. जिल्ह्यात काेविड नियमांचे पालन करून काही गावांत लग्नकार्य आटाेपले.
विविध समाज संघटनेतर्फे वधू-वरांच्या सामूहिक विवाह साेहळ्यांचे आयाेजन दरवर्षी केले जाते. यामागे वर-वधू मंडळींकडील आर्थिक बचतीचा विचार असताे. यावर्षी काेराेनामुळे सर्वच समाजाच्या सामूहिक विवाह साेहळ्यांना पूर्णत: ब्रेक लागला आहे.
बाॅक्स....
तहसीलदारांकडून मिळते परवानगी
- काेविडचे नियम पाळून माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे.
- वधू-वर कुटुंबीयांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून लग्नकार्यासाठी अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात काेणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागत आहे.
- प्राप्त अर्जावर कार्यवाही करून गडचिराेली तालुक्यात अशा विवाह साेहळ्यांना परवानगी दिली जात असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली.
बाॅक्स....
काेविड समितीचे नियंत्रण
काेराेना लाॅकडाऊनच्या काळात गावात हाेणारे छाेटे-माेठे कार्यक्रम तसेच विवाह समारंभावर गावस्तरीय काेविड समितीतील सदस्यांचे नियंत्रण आहे. काेविड समितीमध्ये सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक आदींचा समावेश आहे. २५ लाेकांच्या उपस्थितीत ठरावीक वेळेत काेविडच्या नियमानुसार लग्नकार्य पार पडले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
बाॅक्स...
काही कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा
मे महिन्याच्या अखेरपर्यंत काेराेनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ही शक्यता लक्षात घेऊन वधू-वर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे ढकलेले विवाह कार्य लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयाेजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून असलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.
बाॅक्स...
अनेकजण अडकले विवाह बंधनात
वर्षभरापासून काेराेना संसर्गाची समस्या निर्माण झाली आहे. काेराेनाचा संसर्ग आताच आटाेक्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत अनेक गावांत काेविडचे नियम पाळून लग्नकार्य पार पडले आहेत. लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक उपवर-वधू विवाह बंधनात अडकले आहेत. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह साेहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.
काेट...
काेराेना संसर्गामुळे विवाह कार्यावर मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लाेकांसाठी मंगल कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरासमाेरील माेकळ्या जागेत तसेच उपलब्ध साेयीनुसार घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमच्या मंगल कार्यालयात हाेणारे चार ते पाच विवाह साेहळेही पुढे ढकलण्यात आले आहे. काेराेना संसर्गाच्या समस्येने व्यवसाय बुडाला आहे.
- सुनील पाेरेड्डीवार, संचालक, मंगल कार्यालय, गडचिराेली.