गडचिरोली: जनसामान्यांचे 'दादा' अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, दीड वर्षांपूर्वी त्यांनी गडचिरोलीच्या सभेत सांगितलेला हेलिकॉप्टर प्रवासातील 'तो' थरारक किस्सा आज पुन्हा ताजा झाला. 'हेलिकॉप्टर ढगात शिरल्याने पोटात गोळा आला होता...' अशा शब्दांत पवारांनी मांडलेली आपली ती भीती आणि काळजाचा ठोका चुकवणारा तो अनुभव आठवून आज गडचिरोलीकरांचे डोळे पाणावले आहेत.
अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे 'सुरजागड इस्पात'च्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या आग्रहावरून अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १९ जुलै २०२४ रोजी नागपूरहून हेलिकॉप्टरने आले होते. तेव्हा अचानक हवामान बिघडले आणि हेलिकॉप्टर घनदाट ढगांच्या कचाट्यात सापडले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना अजित पवार आपल्या खास शैलीत मिश्किलपणे म्हणाले होते, 'ढग इतके दाट होते की खालची जमीन दिसेनाशी झाली. वैमानिकाला काही सुचेना आणि माझ्या तर पोटात अक्षरशः गोळा आला होता!, आज नेमकी तशीच एक हवाई सफर काळाचा घाला ठरली आणि महाराष्ट्राचा हा 'कणखर' आवाज कायमचा शांत झाला
फडणवीसांकडून धीर आणि दादांचा 'पांडुरंग' जप
त्या भयावह प्रवासात देवेंद्र फडणवीस यांनी दादांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. फडणवीस म्हणाले होते, 'दादा, माझे आजवर ६ अपघात झाले, पण मला काही झाले नाही, तुम्ही काळजी करू नका.' त्यावर अजित पवारांनी उत्तर दिले होते, 'देवेंद्रजी, तुम्ही तुमचे अपघात सांगत होतात आणि मी इकडे जीव मुठीत धरून पांडुरंगाचा जप करत होतो!' मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचा तो अनुभव सांगताना दादांच्या चेहऱ्यावरचे भाव आजही गडचिरोलीकरांच्या स्मरणात आहेत.
शेवटच्या बैठकीतही गडचिरोलीचाच ध्यास
निधनाच्या अवघ्या एक दिवस आधी, २७ जानेवारी रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिज वाहतुकीसाठी सुरजागड ते हेडरी या ८५ किमी महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली. गडचिरोलीच्या विकासासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा प्रशासकीय निर्णय ठरला.
Web Summary : Ajit Pawar's death revives memories of a harrowing helicopter ride in Gadchiroli. He humorously recounted fearing for his life amidst dense fog, while Fadnavis offered reassurance. His last meeting focused on Gadchiroli's development, approving a crucial highway project.
Web Summary : अजित पवार की मौत ने गढ़चिरौली में एक भयावह हेलीकॉप्टर यात्रा की यादें ताजा कर दीं। उन्होंने घने कोहरे के बीच अपनी जान जाने के डर को हास्यपूर्ण ढंग से याद किया, जबकि फडणवीस ने आश्वासन दिया। उनकी अंतिम बैठक गढ़चिरौली के विकास पर केंद्रित थी, जिसमें एक महत्वपूर्ण राजमार्ग परियोजना को मंजूरी दी गई।