अहेरी तालुका १०० टक्के डिजिटल
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:42+5:302016-04-03T03:50:42+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे अहेरी तालुक्यातील १०० टक्के शाळा मोबाईल डिजिटल झाल्या आहेत.

अहेरी तालुका १०० टक्के डिजिटल
डायटच्या प्राचार्यांची घोषणा : जि. प. शाळांमध्ये विद्यार्थी घेत आहेत ज्ञानरचनावादाचे धडे
अहेरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे अहेरी तालुक्यातील १०० टक्के शाळा मोबाईल डिजिटल झाल्या आहेत. त्याबरोबरच प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी ज्ञानरचनावादानुसार अध्यापनाचे धडे घेत आहेत, अशी घोषणा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. बी. जी. चौरे यांनी शुक्रवारी १ एप्रिल रोजी अहेरी येथे केली.
डायट व गटसाधन केंद्र अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंतराव हायस्कूलच्या सभागृहात तालुक्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व साधनव्यक्ती यांची आढावा सभा व शैक्षणिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. चौरे होते. उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विक्रम गिरे यांच्या हस्ते झाले. विशेष अथिती म्हणून डॉ. रवींद्र रमतकर, डॉ. धनंजय चापले, डॉ. नरेश वैद्य, प्रकाश दुर्गे उपस्थित होते.
तालुक्यातील शाळा १०० टक्के मोबाईल डिजिटल, १०० टक्के तंत्रस्नेही तसेच १०० टक्के ज्ञानरचनावादी झाल्या आहेत, अशी घोषणा डॉ. चौरे यांनी केली. दरम्यान तालुक्याच्या केंद्रातील केंद्रप्रमुखांनी आपापल्या केंद्राचे सादरीकरण केले. तसेच मुख्याध्यापक सुधाकर टेकूल, के. बी. गुंड, शिक्षक संजय कोंकमुटीवार, ओंकाम भीमनपल्लीवार यांनीही सादरीकरण केले. अहेरी तालुक्यातील शाळांची मार्च अखेर ८० ते ९० टक्के प्रगती झाली असून सर्व शाळांमध्ये मोबाईल डिजिटल अंतर्गत अध्यापन केले जात आहे, अशी माहितीही देण्यात आली. दरम्यान येंकापल्ली शाळेचे मुख्याध्यापक इरशाद शेख त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन साधनव्यक्ती सुषमा खराबे तर आभार ताराचंद्र भुरसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)