विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा निर्माण होणार
By Admin | Updated: November 2, 2016 01:14 IST2016-11-02T01:14:16+5:302016-11-02T01:14:16+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.

विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा निर्माण होणार
शासनस्तरावर हालचाली वाढल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांची पत्रकार परिषदेत माहिती
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. या दिशेने भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत, अशी माहिती आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारकडून दोन वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सोमवारी राजमहालात पत्रकार परिषद घेऊन मांडला. यावेळी ते बोलत होते.
मागील सरकारच्या ३३ वर्षातील विकास कामाच्या तुलनेत भाजप-सेना युती सरकारने अतुलनीय कामगिरी केली आहे. विदर्भ राज्य निर्मितीस शासन कटिबद्ध असून माझ्याकडूनही याकरिता प्रयत्न सुरू आहे, असे ना. आत्राम यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक मोठ्या नद्यांवर व नाल्यांवर पूल निर्मिती तसेच सिंचन क्षेत्र निर्माण करणे तसेच महामार्ग निर्मिती करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यातील बंगाली बांधवांना त्यांच्या जमिनजुमल्याचे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ओपीटीसी आदी माध्यमातून निधी उपलब्ध करावा लागणार आहे. जिल्ह्यातील आलापल्लीसह पाचही मॉडेल स्कूलकरिता अडीच कोटींचा निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. याशिवाय नागेपल्ली येथे ८.५० कोटी रूपयांच्या नळ योजनेचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. मार्र्कंडा तिर्थस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. चिन्ना-वेट्रा सिंचन प्रकल्पाचे काम ८० टक्के झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ना. आत्राम पत्रकार परिषदेत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. विविध नाविण्यपूर्ण योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, अमोल गुडेल्लीवार, सय्यद मिसार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मेडिगट्टा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने एकही घर बुडणार नाही. उलट या सिंचन प्रकल्पामुळे अहेरी व सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जवळपास २५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी उलट प्रवाहाने प्राणहिता नदीमार्गाने येणार असल्याने अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा होणार आहे. चव्हेला प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर अहेरी तालुका उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या समस्यापासून पूर्णत: मुक्त होणार आहे. देवलमरी, रेगुंठा, महागाव हे लघु सिंचन प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी सांगितले.
सूरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच होणार
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्प परिसरात लायड मेटल कंपनीमार्फत लोह दगड उत्खननाचे काम करण्यात आले. यातून ३०० मजुरांना २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सूरजागड लोह प्रकल्प एटापल्ली तालुक्यात अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ना. आत्राम यांनी दिली. प्रकल्पाच्या अनुषंगाने एटापल्ली तालुक्यातील ५०० वर बेरोजगारांना आयटीआय प्रशिक्षणाची गरज आहे. गडचिरोली-सूरजागड लोह मार्गाचे सर्वेक्षण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.