तलावातील मगरीमुळे नागरिकांमध्ये वाढली उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:48+5:30
तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

तलावातील मगरीमुळे नागरिकांमध्ये वाढली उत्कंठा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात नागरिकांना वारंवार मगरीचे दर्शन होत असल्यामुळे मगर पाहण्यासाठी या तलावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पण सोबतच भीतीचेही वातावरणही निर्माण झाले आहे. अनेकांना मगरीचे दर्शन झाले असल्याने लोक विविध प्रकारची चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. मगरीपासून धोका होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचाच या तलावात त्यावेळी मगरीचा मागमूसही नव्हता. त्यानंतरच्या काळात भरपूर पाऊस झाल्यामुळे हा तलाव कोरडा पडला नाही.
पावसाळ्याच्या पुरात कुठूनतरी मगरीचे पिल्लू वाहत आले असावे. त्या नर-मादीमुळे या ठिकाणी एका पेक्षा अधिक मगरी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील पिल्लू मोठी झाल्याने तलावाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असावी, अशी शंका येत आहे. या तलावाच्या काठावर महादेवाचे नाग मंदिर असल्याने येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. निर्माल्य विसर्जन ही नित्याची बाब झाली आहे. या तलावातील मगरीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, तशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
तलाव सौंदर्यीकरणाच्या मागणीला जोर
चामोर्शी शहरात विरंगुळा व मनोरंजनाचे कोणतेही मोठे साधन नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तलावाचे सौंदर्यीकरण करून तेथे नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यास नगर पंचायतीच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास मगरीसारख्या प्राण्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही. पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल. तसेच चामोर्शीकरांसाठी विरंगुळ्याचे चांगले स्थळ निर्माण होईल, असा नागरिकांमध्ये सूर आहे.
सदर तलावात भरपूर पाणी असल्याने येथील मगरीला पकडणे सध्या अशक्य आहे. या तलावातील पाणी कमी होताच मगरीला पकडले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी तसेच या तलावात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तलावाच्या पाळीवरून ये-जा करणाऱ्यांनीही विशेष खबरदारी घ्यावी.
- प्रवीण लेले,
वनपरिक्षेत्राधिकारी, चामोर्शी
तलावातील मगरीला पकडणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. वनविभाग आम्हाला जे सहकार्य मागेल ते सहकार्य आम्ही करू.
- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी