भेसळयुक्त ताडी, आरोग्याशी खेळ! काही विक्रेत्यांकडून विकला जातो भेसळयुक्त रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:15 IST2025-02-25T12:11:07+5:302025-02-25T12:15:42+5:30

Gadchiroli : ताडीत भेसळ करण्याचा प्रकार केवळ ग्रामीण भागात आढळून येतो.

Adulterated toddy, play with health! Some vendors sell adulterated juice | भेसळयुक्त ताडी, आरोग्याशी खेळ! काही विक्रेत्यांकडून विकला जातो भेसळयुक्त रस

Adulterated toddy, play with health! Some vendors sell adulterated juice

दिगांबर जवादे 
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जानेवारी महिन्याला सुरुवात झाल्यानंतर ताडाच्या झाडापासून रस काढण्यास सुरुवात होते. ताडाचा रस आरोग्यासाठी चांगला मानला जात असल्याने अनेक नागरिक हा रस पितात. याचा गैरफायदा काही ताडी विक्रेत्यांनी घेण्यास सुरुवात केली. ताडीमध्ये रासायनिक द्रव्ये टाकली जात आहेत. यामुळे नशा येणारी ताडी पिण्याचे व्यसन काही व्यक्तींना लागले आहे. तसेच ही ताडी आरोग्यास धोकादायक ठरत आहे.


ताडाच्या झाडाला जवळपास जानेवारी महिन्यापासून रस निघण्यास सुरुवात होते. पूर्वी गावात एखाद्याच्या शेतात ताडाचे झाड असेल तर गावातील हिंमतवान व्यक्ती झाडावर चढून त्यापासून ताडी काढली जात होती. झाडावरून उतरवल्याबरोबर सकाळीच ताडी पिली जात होती. आता मात्र ताडीला व्यावसायिकपणा आला आहे. ताडीच्या झाडाचा रस काढणारे काही व्यावसायिक तयार झाले आहेत. शेतमालकाला पैसे देऊन ते ताडी काढतात. गावात भाड्याने खोली करून ते राहतात. अधिक पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी आता ताडीत घातक रसायने टाकली जात आहेत. या रसायनांमुळे व्यक्तीला नशा येत असते.


हायड्रोक्लोराईड पावडरचा होतोय सर्रास वापर
काही ताडी विक्रेते ताडीच्या रसात हायड्रोक्लोराईड पावडरचा वापर करतात. त्यामुळे नशा येत असते. काही ताडी विक्रेते विशिष्ट रसायन असलेल्या गोळ्या टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व रसायनांचे मिश्रण तयार होऊन ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.


४० रुपये ग्लास दराने ताडीची विक्री ग्रामीण भागात केली जात आहे. ज्या दिवशी गावातील नागरिकांना दारू मिळत नाही. त्या दिवशी ताडीची नशा केली जाते.


भाड्याच्या खोलीत विक्री
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत लाखो रुपयांची कमाई होत असल्याने आता ताडी काढणे व विक्री करण्याचा व्यवसाय बनला आहे. ताडी काढणारे गावाच्या बाहेर शेतशिवारातील एखाद्या घरी भाड्याने राहतात. त्या ठिकाणी ताडीची विक्री करतात. गावातील शौकिन त्या ठिकाणी जाऊन ताडी पित असल्याचे दिसून येत आहे.


दुर्गम भागात शुद्ध ताडी

  • ताडीत भेसळ करण्याचा प्रकार केवळ ग्रामीण भागात आढळून येतो. 
  • गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी यासारख्या तालुक्यांमध्ये ताडाची झाडे कमी आहेत.
  • त्या तुलनेत पिणाऱ्यांची संख्या 3 अधिक आहे. तसेच काहींना नशेची गरज असते.
  • अशा वेळी ताडीमध्ये नशेचे रसायन मिक्स केले जाते. दुर्गम भागात मात्र काहीच मिसळवले जात नाही.


"ताडीत रसायन मिसळविणे हा गंभीर गुन्हा आहे. ताडीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जातील. गावात रसायनयुक्त ताडी विकली जात असेल तर माहिती प्रशासनाला द्यावी."
- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी, गडचिरोली

Web Title: Adulterated toddy, play with health! Some vendors sell adulterated juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.