मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतले २४ विद्यार्थ्यांना दत्तक
By Admin | Updated: October 13, 2016 02:46 IST2016-10-13T02:46:16+5:302016-10-13T02:46:16+5:30
स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडील

मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतले २४ विद्यार्थ्यांना दत्तक
प्रेरणादायी उपक्रम : बांडे नदीपलीकडच्या गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात
एटापल्ली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडील बोडमेट्टा, येडसगोंदी, आलुरटोला, कुसुमपल्ली व आलेगा या गावातील अनेक विद्यार्थी पटावर दाखल आहेत. मात्र बांडे नदीमुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते. ही अडचण लक्षात घेऊन या शाळेचे मुख्याध्यापक सखाराम झोडे यांनी संबंधित गावातील २४ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांचा निवास, कपडे, शालेय साहित्य आदी व्यवस्था येथील शिक्षकांनी स्वत: उचलली आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची गुणवत्ता नसल्याची सबब पुढे करून अनेक पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश खासगी शाळांमध्ये करीत असतात. परिणामी अनेक जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रयत्नामुळे पुरसलगोंदी शाळा याला अपवाद ठरली आहे. सूरजागड केंद्रातील पुरसलगोंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना २७ जून १९५४ मध्ये झाली. त्यावेळी या शाळेत केवळ आठ विद्यार्थी दाखल होते. यंदाच्या सन २०१६-१७ शैक्षणिक सत्रात या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मिळून तब्बल १०२ विद्यार्थी दाखल आहेत. २७ जून २०११ रोजी सिरोंचा तालुक्यातील शिक्षक सखाराम झोडे हे मुख्याध्यापक म्हणून पुरसलगोंदी जि. प. शाळेत रूजू झाले. त्यावेळी त्यांनी या शाळेतील समस्या जाणून घेतल्या. पुरसलगोंदी शाळेत परिसरातील बोडमेट्टा, येडसगोंदी, आलेंगा, कुसुमपल्ली, पामाजीगुडा, नेंडर, मंगेर, टिटोळा, पालेटोला आदी गावातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थी दाखल आहेत. यापैकी बोडमेट्टा, येडसगोंदी, आल्लुरटोला, कुसुमपल्ली, आलेगा आदी गावे बारमाही वाहणाऱ्या बांडे नदीपलिकडे आहेत.
सदर बांडे नदीवर पूल बांधण्यात आला नाही. त्यामुळे नदीपलिकडील गावातून दररोज पुरसलगोंदीच्या शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. विद्यार्थ्यांची शाळा बुडू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने नदीपलिकडच्या गावातील २४ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा धाडसी निर्णय मुख्याध्यापक सखाराम झोडे यांनी घेतला. सदर निर्णयाला शाळेतील कार्यरत शिक्षकांनीही साथ दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या पुरसलगोंदी जि. प. शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. दत्तक घेतलेल्या २४ विद्यार्थ्यांच्या भोजन व निवास व्यवस्थेसाठी सदर शिक्षक दर महिन्याला आपल्या वेतनातून चार ते सहा हजार रूपये जमा करतात. या पैशातून दत्तक घेतलेल्या २४ विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाते.
सदर शाळेत मुख्याध्यापक सखाराम झोडे यांच्यासह व्ही. एच. बुद्धावार, पी. एम. केंद्रे, के. के. अम्मावार, सी. आर. वेडदा, व्ही. यू. वानखेडे आदी कार्यरत आहेत. पुरसलगोंदी शाळा परिसर नीलगिरी, करंजी, सीताफळ, पपई, तुळस आदीसह अनेक प्रकारची फुलझाडांनी हिरवेगार आहे. शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
समितीच्या सहकार्याने बांधले भोजन कक्ष
सन २०१५-१६ मध्ये शाळा व्यवस्थापन समिती व येथील शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून १ लाख ३० हजार रूपये खर्चातून या शाळेत भोजन कक्ष व एका वर्गखोलीचे बांधकाम केले. याकरिता प्रत्येक शिक्षकांनी पाच हजार रूपयांची मदत केली. सदर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या लक्षात घेता शासनाने या शाळेला समूह निवासी वसतिगृह मंजूर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. पुरसलगोंदी शाळेच्या प्रगतीत तत्कालीन मुख्याध्यापक दीपक नागपूरवार यांचेही सहकार्य लाभले आहे.