शेतीच्या मशागतीसाठी बळीराजा शेत शिवारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:03+5:302021-05-06T04:39:03+5:30
यावर्षी कोरोना पार्श्वभूमीमुळे सालगड्याचे भाव व वाढती मागणी असल्याने सालगडी मिळेनासे होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे सालगडी व वाढत्या ...

शेतीच्या मशागतीसाठी बळीराजा शेत शिवारात दाखल
यावर्षी कोरोना पार्श्वभूमीमुळे सालगड्याचे भाव व वाढती मागणी असल्याने सालगडी मिळेनासे होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे सालगडी व वाढत्या किमतीमुळे बैलांचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले आहे तर दिवसेंदिवस मजुरीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमी वेळात शेतीचे कामे आटोपून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी आदी कामे हाती घेत आहेत. सध्या कोरोनाचे संकट असल्याने भीतीने मजुरांनी शेतीच्या कामांसाठी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिक पद्धतीच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. त्यातच डिझेलचे दर प्रचंड वाढले असल्याने नांगरणी, वखरणीसाठी प्रतितास ७०० ते ८०० रुपये ट्रॅक्टरच्या भाड्यासाठी मोजावे लागत आहे.
सध्या अवकाळी पावसामुळे जमिनीत थोडा फार ओलावा आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी काम करताना दिसून येत आहेत. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी जेमतेम १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पाऊस आला तर शेतातील भात खाचराची साफसफाई राहून जाईल या भीतीने शेतकरी सकाळी शेताच्या बांधांवर दिसून येत आहेत तसेच काही शेतकऱ्यांनी शेणखत शेतात टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
(बॉक्स)
चुकाऱ्यांअभावी शेतकरी अडचणीत
- यावर्षी धान खरेदी प्रक्रिया गुंतागुंतीची होती त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, त्यामुळे बी-बियाणे व शेती मशागती खर्च कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
- पावसाचे रोहिणी नक्षत्र २५ मे ला सुरू होत असून वाहन मेंढा आहे. शेतकरी पावसाच्या नक्षत्रांचा विचार करून शेतातील कामे करत असतात. दरवर्षी खरीप हंगामात पावसाची हुलकावणी मिळते, यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.