केवळ सात संस्था सुरू : अनेक दुग्ध संस्थांना लागले टाळेदिगांबर जवादे - गडचिरोलीगडचिरोली जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा उत्पादक संघावर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक गणवीर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा दूग्ध विकास अधिकारी आर. बी. खुडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात २१६ दूग्ध सहकारी संस्था निर्माण झाल्या. मात्र गडचिरोली जिल्ह्यात शासनाने अथक प्रयत्न करूनही दुग्ध उत्पादन वाढू शकले नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना तत्कालीन पशुसंवर्धन व दूग्ध विकास मंत्री अनिस अहमद यांनी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील दूध शीतकरण केंद्र पुन्हा सुरू करून या भागात दूध उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गडचिरोलीलगतच्या कनेरी येथील दूध शीतकरण केंद्रालाही राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. विविध पॅकेज अंतर्गत याच काळात अनेक गावात शेतकऱ्यांना दूधाळू जनावराचे वाटपही जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात दूधाचे उत्पादन वाढले नाही व जिल्ह्यातील जवळजवळ २१० दूग्ध सहकारी संस्थांना टाळे लागण्याची पाळी आली व जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून खासगी व सहकारी तत्वावरील दूध उत्पादक संघाचे दूध मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागले. मधल्या काळात गडचिरोली येथे संकलीत झालेले दूध चंद्रपूर येथे निर्जतुंकीकरण करण्यासाठी नेण्यात येत होते. परंतु या वाहतुकीचा खर्चच अधिक झाल्याने याच्यावर नियंत्रण आणण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी याबाबतचा अहवालही शासनाला पाठविला होता. गडचिरोली जिल्हा दूध उत्पादक संघ दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने या जिल्हा दूध उत्पादक संघावर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला व जिल्हा दूग्ध विकास अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून येथे सहाय्यक निबंधक गणवीर यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा दूध संघावर प्रशासक
By admin | Updated: August 21, 2014 23:51 IST