आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये मिळत आहेत नीटचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:28 IST2018-08-13T13:23:42+5:302018-08-13T13:28:51+5:30
आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये मिळत आहेत नीटचे धडे
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणाऱ्या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. आठवड्यातील शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कक्षाला ‘उलगुलान ’ असे नाव देण्यात आले आहे.
धारणी प्रकल्प कार्यालय व पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट ही स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातला हा पहिला प्रयोग धारणी तालुक्यात राबविला जात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून स्वखर्चाने बिजुधावडी येथे येऊन शिकवीत आहेत.
तत्कालीन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेसोबत संवाद साधून प्रयत्न केले. त्यांची प्रामाणिक तळमळ यशस्वी ठरली.
विद्यार्थी वैद्यकीय परीक्षापूर्व धडे आश्रमशाळेतील एका खोलीतच गिरवतात. त्यांना शांततापूर्ण वातावरण मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यासाठी संबंधित लिफ्ट इक्विपमेंट व प्रकल्प कार्यालय प्रयत्नशील आहे. या उपक्रमातून अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. आता मेळघाटला त्यांच्या मातीतील डॉक्टर तयार होतील.
- शिवानंद पेढेकर, सहायक प्रकल्प अधिकारी,
आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी
तज्ज्ञ मंडळींकडून मोफत मार्गदर्शन
मेळघाटच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर नसल्याने आदिवासी रुग्णांसह बालकांना नाहक जीव गमवावा लागतो. तेव्हा मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्टर निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने बिजुधावडीच्या आश्रमशाळेत उलगुलान कक्षात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे धडे दिले जात आहेत. ९ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचा मुहूर्त झाला. परिसरातील राणीगाव, टेंभली, सुसर्दा, टेम्ब्रुसोंडा, बिजुधवडी या आश्रमशाळांमध्ये इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विज्ञान शाखेच्या प्रत्येकी दहा अशा एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर संस्थेच्या तज्ज्ञ मंडळीकडून येण्या-जाण्याच्या खर्चासकट कुठलाही मोबदला न घेता मोफत नीट २०१९ वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.
पुण्यात फडकला मेळघाटचा झेंडा
जानेवारी महिन्यात एका कार्यक्रमांमध्ये आश्रमशाळेतील शांतीलाल सावलकर या आदिवासी विद्याथ्यार्ने पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांपुढे इंग्रजीत भाषण करून सर्वांना अचंबित केले. प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, सुधीर चव्हाण, अतुल ढाकणे, संतोष, केतन, फारुख, परिमल, आकाश आदी सहकारी राज्यातला पहिला प्रयोग यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.