व्यसनाने आरोग्यासोबत आर्थिक स्थैर्य धोक्यात
By Admin | Updated: October 25, 2016 00:57 IST2016-10-25T00:57:42+5:302016-10-25T00:57:42+5:30
आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. हालअपेष्ठा, मेहनत करून कमाविलेला पैसा गुटखा, तंबाखू, खर्रा, दारू यासारख्या व्यसनांवर खर्च केला जातोे.

व्यसनाने आरोग्यासोबत आर्थिक स्थैर्य धोक्यात
सत्यपाल महाराजांचे मार्गदर्शन : चामोर्शी येथे कीर्तन; अनिष्ठ रूढींवर केला प्रहार; पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती
चामोर्शी : आजची पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. हालअपेष्ठा, मेहनत करून कमाविलेला पैसा गुटखा, तंबाखू, खर्रा, दारू यासारख्या व्यसनांवर खर्च केला जातोे. यामुळे समाजाचे स्वास्थ, सामाजिक सुरक्षा व स्वत:चे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे असल्याचे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले.
मुक्तीपथ महाराष्ट्र शासन, सर्च, टाटा स्ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन रविवारी रात्री करण्यात आले होते. याप्रसंगी कीर्तनातून ते मार्गदर्शन करत होते. तुकड्या दास म्हणे, ऐकाना व्यसने सगळी सोडून द्याना!, सरळपणाचे जीवन जगाना, लोभ सर्वांचे कराना! व्यसनामध्ये पैसा खर्च करून आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा तोच पैसा शिक्षणासाठी कुटुंबाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करा, पोथी वाचा किंवा वाचू नका परंतु वर्तमानपत्र दररोज वाचा, आपल्या जीवनाला चांगला आकार द्या, असा कडकडीचा संदेश दिला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग, प्राचार्य वाय. आर. मेश्राम, पोलीस निरीक्षक किरण अवचर उपस्थित होते. यावेळी पाच हजारांच्या वर नागरिक उपस्थित होते. सत्यपाल महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मनोरंजन करीत समाजप्रबोेधन केले. लग्न कुणाशीही करा पण प्रथम शिका, मुलगी दिसायला चांगली नसेल तरी चालेले, परंतु शिकलेली असावी, असे सांगत त्यांनी हुंडा पद्धतीवर प्रहार केला. हागणदारीमुक्तीकडे वळत त्यांनी शाहजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधला, तुम्ही बायकोच्या लज्जेसाठी शौचालय बांधा, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवा, देशाची व आईवडिलांची मान खाली जाईल, असे काम करू नका, भानामती, भूत, देवी या प्रकारांपासून दूर राहा. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरून लपून आणली जात असलेली दारू स्त्रियांनी बंद करावी, दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांनी दारूविक्री विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन केले.
कीर्तनात सत्यपाल महाराजांना गजानन चिंचोलकर, रामचंद्र तांबकर, सुनील कुमार, राजेश काईगे यांनी साथ संगत दिली. मुक्तीपथचे तालुका संघटक दिलीप वखरे, सहसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर, प्रकल्प अधिकारी संतोष सावळकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)