पोलिस ठाणे स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारवाई; कवंडे परिसरात माओवाद्यांची चार स्मारके उध्दवस्थ
By संजय तिपाले | Updated: March 10, 2025 18:21 IST2025-03-10T18:19:50+5:302025-03-10T18:21:21+5:30
Gadchiroli : कवंडे परिसरात पोलिसांनी अभियान तीव्र केल्याने गुन्हेचळवळीला मोठा धक्का

Action taken the next day after establishing a police station; Four Maoist monuments in Kawande area demolished
संजय तिपाले
गडचिरोली: छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कवंडे गावात पोलिस ठाणे स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या परिसरातील माओवाद्यांची चार स्मारके उध्दवस्थ करण्यात आली. माओवाद्यांचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या कवंडे परिसरात पोलिसांनी अभियान तीव्र केल्याने गुन्हेचळवळीला मोठा धक्का बसला आहे.
कवंडे गावात पोहोचण्यासाठी पोलिसांना दोन दिवस रस्ता बनविण्यासाठी लागले. त्यानंतर २४ तासांत उभारलेल्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन ९ मार्च रोजी केले. रस्ता तयार करताना या परिसरात अगोदरच्या काळातच माओवाद्यांनीे स्मारके बांधलेली असल्याचे निदर्शनास आले होते. सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती.
यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी बॉम्बशोधक व नाशक पथक व विशेष अभियानच्या पथकामार्फत परिसरात शोध अभियान राबविले. मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर तसेच कवंडे पोलिस ठाण्याच्या शेजारील परिसरातील माओवाद्यांची चार स्मारके उध्दवस्थ करण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश , एम. व्ही . सत्यसाई कार्तिक,उपअधीक्षक विशाल नागरगोेजे , अमर मोहिते आदी उपस्थित होते.
माओवाद्यांची पुरती कोंडी
माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, नेलगुंडा व पाठोपाठ कवंडे या छत्तीसगड सीमेवरील गावांमध्ये चालू वर्षी सव्वा तीन महिन्यांत तीन पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. माओवाद्यांना हा मोठा धक्का असून त्यांची यामुळे पुरती कोंडी झाली आहे.
"या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. यासोबतच अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही. त्यामुळे ते उध्दवस्थ केले आहेत. हा परिसर माओवादमुक्त करुन नागरिकांपर्यंत विकासाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक