धान्य घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा ; दोघांचे निलंबन, १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:39 IST2025-04-11T15:38:55+5:302025-04-11T15:39:54+5:30

Gadchiroli : २ कोटींच्या वसुलीचे जिल्हाधिकारी पंडा यांचे आदेश

Action against grain scammers intensified; Two suspended, 16 officers questioned | धान्य घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा ; दोघांचे निलंबन, १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

Action against grain scammers intensified; Two suspended, 16 officers questioned

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यातील तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दणका दिला आहे. तीन प्रकरणांत तब्बल २ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले असून दोघांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. यासोबतच १६ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.


धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा जिल्हा प्रशासनाने यातून दिला आहे. तथापि, २०११ मधील अपहार प्रकरणी अद्याप पूर्ण वसुली झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे इतकी वर्षे त्यांना कोण पाठीशी घालत होते, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.


प्रकरण १ : अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षक निलंबित करण्यात आले आहे. २२.४२ लाखांची वसुली सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असून ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.


प्रकरण २ : सिरोंचा येथील २०११ सालच्या धान्य अपहारप्रकरणी २४.८ लाखांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.


प्रकरण ३: आदिवासी विकास संस्था, देऊळगाव (ता. कुरखेडा) येथे २०२३-२४ मध्ये ३,९०० क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून १५३ कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


धान्य साठ्यांची १०० टक्के तपासणी
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्य साठ्याची १०० टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. २ एप्रिल रोजी झालेल्या पेंडी होर्डिंग कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.


१३ राइस मिलर्सच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
२०११ मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या २.६७ कोटी रुपयांच्या दंडापैकी १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित ७२ लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या १३ राइस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.


देऊळगाव संस्थेच्या व्यवस्थापकांचे उपप्रादेशिक व्यवस्थापकांवर गंभीर आरोप

  • कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील १ कोटी ५३ लाख रुपयांच्या बहुचर्चित तांदूळ घोटाळ्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापकांनी संस्थेला नोटीस बजावली.
  • यानंतर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी 3 संस्थेच्या व्यवस्थापकांनी आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीस संचालकांना ९ एप्रिल रोजी पत्र पाठवून उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
  • उपप्रादेशिक व्यवस्थापकांच्या सांगण्यावरूनच शेतकऱ्यांच्या नावाने धानाचे पैसे काढले असा दावा व्यवस्थापकांनी केला आहे. नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालकांसोबत माझे घरगुती संबंध आहेत, त्यामुळे मी सांगतो तसे तू कर काही होणार नाही, असे म्हणत नोटीसला उत्तरही त्यांनीच लिहिले व माझी दबाव टाकून स्वाक्षरी घेतल्याचा आरोप व्यवस्थापकांनी ठेवला आहे.
  • वरिष्ठांना व संचालकांना पैसे द्यावे लागतात, असे म्हणत धमकावून माझ्याकडून पैशांची वसुली केल्याचा दावादेखील व्यवस्थापकांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांचे पाय खोलात गेले आहेत.

Web Title: Action against grain scammers intensified; Two suspended, 16 officers questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.