तक्रारकर्त्याचे काम निपटवून देण्याचाही एसीबीचा प्रयत्न
By Admin | Updated: September 11, 2014 23:31 IST2014-09-11T23:31:08+5:302014-09-11T23:31:08+5:30
अनेकदा संपर्क करूनही शासकीय कार्यालयातून काम होत नाही. या कामासाठी लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येण्याऐवजी पैसे देऊन काम करून

तक्रारकर्त्याचे काम निपटवून देण्याचाही एसीबीचा प्रयत्न
गडचिरोली : अनेकदा संपर्क करूनही शासकीय कार्यालयातून काम होत नाही. या कामासाठी लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येण्याऐवजी पैसे देऊन काम करून घेण्यावर अनेकजण भर देतात. ही बाब लक्षात घेऊन आता संबंधीत व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केल्यास त्याचे कामही करवून देऊन लाचखोरावर कारवाई करण्याबाबत एसीबी प्रयत्न करणार आहे, असे संकेत मिळाले आहे.
अनेकदा शासकीय कार्यालयात सरकारी योजनांचा लाभ, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा असलेला आर्थिक लाभ तसेच शासकीय कामाचे देयक काढण्यासाठी सर्वसामान्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी अनेकदा वरिष्ठ अधिकारी त्यांच्याअंतर्गत काम करणारे कनिष्ठ कर्मचारी हे लाच मागतात. आपण जर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तर आपले काम कायमचे होणारच नाही, अशी भितीही अनेक तक्रारकर्त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे न येता पैसे देऊन आपले काम करून घेतात. त्यामुळे एसीबीकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ कमी होतो व भ्रष्टाचार करणारे निर्ढावतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरी विरोधात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे रखडलेले काम पूर्ण करून देण्याचीही हमी उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक लाचखोरांना अशा प्रकरणात जेरबंद केल्यावर एसीबीचे अधिकारी संबंधीत तक्रारकर्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आपले कर्मचारी, अधिकारी त्या कार्यालयात पाठवून संबंधीत कामाचा पाठपुरावाही करण्याचे काम करीत आहे. अनेकदा लाचखोर पकडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीनावर सुटल्यावर तो पुन्हा त्या पदाच्या खूर्चीवर जाऊन बसतो. त्यामुळे तक्रारकर्ते धास्तावलेले असतात. आपले काम होईल की नाही याची शाश्वती त्यांना राहत नाही. त्यामुळे एसीबीने हे पुढचे पाऊल उचलले आहे. संबंधीत अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन व्हावे, यासाठी पकडलेल्या दिवशीच शासनाच्या जीआरनुसार संबंधीत लाचखोरावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे कळविले जाते, अशी माहिती एसीबीचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूणच लाचखोरीच्या विरोधात कठोर मोहीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उभारली असून ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधातील जनचळवळ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापरही एसीबी करीत आहे. नागरिकांकरीता १०६४ हा टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे. निर्भिडपणे नागरिकांनी सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)