अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:12 IST2025-01-13T15:11:09+5:302025-01-13T15:12:11+5:30
आरोपी पसार : चिचगड ठाण्यात गुन्हा दाखल

Abused minor girl gives birth to baby
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, अत्याचारग्रस्त अल्पवयीन पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडितेनी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनंतर आरोपी फरार झाला आहे. विशेष म्हणजे, पंधरवड्यात कोरची तालुक्यातील ही दुसरी घटना असून तालुक्यातील एकाच गावातील दोन पीडित आहेत.
प्रवीण महेश मडावी (२०) रा. कोटरा, तालुका कोरची असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. तिला ग्रामीण रुग्णालय चिचगड भरती करण्यात आले. येथे तिने एका निरागस बाळाला जन्म दिला आहे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड रुग्णालयात प्रसूत झाल्यामुळे चिचगड पोलिस ठाण्यात कलम ३७६ (१) सहकलम ४, ६ पोस्को अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सध्या पसार आहे. कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.
गोंदिया येथे उपचार सुरू
अत्याचार झाला त्यावेळी मुलगी १७ वर्षांची होती. आता मात्र, १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. अत्याचाराच्या वेळी वय कमी असल्याने पोलिसांनी पोक्सो दाखल केला आहे.