शहरातील बेवारस प्लास्टिक जातेय जनावरांच्या पोटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:13 IST2024-07-08T16:12:13+5:302024-07-08T16:13:35+5:30
जनावरांच्या जिवाला धोका : कठोर कारवाईची आवश्यकता, प्रशासन सुस्त

Abandoned plastic in the city goes into the stomachs of animals
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शहरात दिवसेंदिवस बेवारस जनावरांची संख्या वाढत चालली आहे. ही बेवारस जनावरे दिवसभर मुख्य रस्त्याने फिरत असतात. तर कधी रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. ही जनावरे प्लास्टिक खाऊन जीवन जगताना दिसून येत आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
चामोर्शी तालुका मुख्यालयात व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिक उरलेले अन्न जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे ही जनावरे हॉटेल असलेल्या परिसरात अधिक दिसून येतात. जनावरे दिवसभर रस्त्याने भटकंती करीत असल्याने दुचाकी तसेच इतर वाहनांना पिशवी दिसली की त्या वाहनाजवळ जाऊन पिशवी फाडून त्यातील वस्तू फस्त करीत आहेत.
एवढेच नव्हे तर कागद, प्लास्टिक इतर वस्तू सर्रास खाताना दिसून येत आहेत. शहरात मोकाट जनावरांच्या आरोग्यासाठी जनावरांचे मालक फारसे गंभीर नसल्याने जनावरे कागद, प्लास्टिक यांना चारा समजून खाताना दिसून येत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. दिवसेंदिवस जनावरांची संख्या अनेक कारणांमुळे घटत आहे. तर एकीकडे बेवारस जनावरे शहरात आढळून येत आहेत. बेवारस जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शहरात नगरपंचायतकडून अनेकदा जनजागृती करून हॉटेल, दुकाने तसेच बाजारात पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यावर १०० टक्के आळा बसला नाही.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल, ग्लास आणि प्लेट आदी वस्तू वापरून फेकून दिल्यावर ती वर्षानुवर्षे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किवा नद्या आणि समुद्रात साचून राहतात. त्यामुळे देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे. तरीही प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारे सर्रासपणे सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याची आवश्यकता आहे.
"शहरात प्लास्टिक निर्मूलनासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून पथक नेमले आहेत. त्या पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आठवडी बाजार, हॉटेल, व्यावसायिकाच्या दुकानात पथक भेट देत असतात. यापूर्वी प्लास्टिक पिशव्या जप्तीतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यामुक्तीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखावे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे."
- श्रीकांत फागणेकर, मुख्याधिकारी न.पं., चामोर्शी