आमगाव (बु.) पाच वर्षांसाठी दत्तक
By Admin | Updated: December 13, 2015 01:32 IST2015-12-13T01:32:13+5:302015-12-13T01:32:13+5:30
गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील ...

आमगाव (बु.) पाच वर्षांसाठी दत्तक
देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयाचा पुढाकार : रासेयो विभागातर्फे ग्रामविकास नियोजनावर ग्रामपंचायतीत चर्चा
देसाईगंज : गावाचा विकास होईल तरच देशाचा विकास शक्य आहे, हा मूलमंत्र जपत स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने तालुक्यातील आमगाव (बु.) गाव पुढील पाच वर्षांसाठी दत्तक घेण्याचे ठरविले आहे. गाव विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्याच्या हेतूने आमगाव (बु.) येथे ग्राम पंचायत सभागृहात नुकतीच सभा आयोजित करून गाव विकासासंदर्भात ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेला सरपंच अनिल चंडीकार, उपसरपंच योगेश नाकतोडे, पोलीस पाटील प्रतिमा बोदेले, ग्राम सचिव पेशने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाकतोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश धोटे, प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश हलामी आदी उपस्थित होते. पाच वर्षांमध्ये दत्तक गावाला आदर्श गाव बनविण्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता वास्तविक परिस्थितीच्या अभ्यासाअंती ग्राम विकासाचे नियोजन सभेत करण्यात आले. महाविद्यालयातील रासेयो विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण व योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गावातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात महाविद्यालय कटिबद्ध असून आमगाव (बु.) आदर्श गाव बनेल असा आशावाद प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांनी सभेत व्यक्त केला. सभेला डॉ. गहाणे, डॉ. एच. बी. धोटे, डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. चावके, ग्रा. पं. सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
विकासात्मक पैलूंवर राहणार भर
गावाच्या विकासात्मक बाबींना प्राधान्य देत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे, शेतीसाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम’, गावातील अतिक्रमण दूर करणे, शिक्षण, बाल आरोग्य, महिला सक्षमीकरण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, व्यसनाधीनता दूर करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, पशुचिकित्सा, सामाजिक जागृती, कृषीविषयक व कृषी पूरक योजना, रोजगार मार्गदर्शन आदी विषयांवर गाव विकास नियोजन आराखड्यात भर देण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण बाबींवर सभेत विचारमंथन करण्यात आले.