उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दोन युवक जागीच ठार
By गेापाल लाजुरकर | Updated: June 6, 2023 18:06 IST2023-06-06T18:05:31+5:302023-06-06T18:06:20+5:30
चामोर्शी तालुक्याच्या देवडीजवळची घटना

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दोन युवक जागीच ठार
गडचिराेली : चामाेर्शी शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या देवडी गावाजवळ धान वाहतूक करणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना ५ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली. ठार झालेले दोघेही युवक मासेमारी व विक्रीचा व्यवसाय करीत होते.
प्रशांत सुनील सरकार (३५) व बादल कलीपद मल्लिक (३५) रा. श्रीनिवासपूर ता. चामाेर्शी असे जागीच ठार झालेल्या मच्छीव्यवसायिकांचे नाव आहे. सरकार व मल्लिक हे दोघेही एम.एच ३३ -वाय ७९७२ क्रमांकाच्या एक्टिवा मोपेड दुचाकीने चामोर्शीवरून गडचिरोलीच्या दिशेने सोमवारी सायंकाळी जात होते. दरम्यान चामोर्शी जवळील देवडी गावाजवळ ४ जूनपासून धान वाहतूक करणारा एम.एच. ३० एबी ४६४४ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता.
सदर ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघेही जागेवरच ठार झाले. विशेष म्हणजे, ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. तो बाजूला ठेवणे गरजेचे होते. परंतु संबंधितांनी निष्काळजीपणा केला. याबाबतची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तुषार पाटील करीत आहेत.