मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:45 IST2025-06-06T12:44:32+5:302025-06-06T12:45:20+5:30

Gadchiroli : दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप, पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना

A tiger killed a woman who had gone to collect locusts. | मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

A tiger killed a woman who had gone to collect locusts.

लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा (जि. गडचिरोली) :
मोह टोळाच्या वेचणीकरता जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना पोर्ला वनपरिक्षेत्राच्या देलोडा (ता. आरमोरी) जंगलात ५ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. मीरा आत्माराम कोवे (५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.


मीरा कोवे या सकाळी १० वाजताच्या सुमारास जेवण करून गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्र. (१०) मध्ये टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. पोर्ला ते वडधा मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले तेव्हा बराचवेळ उलटूनसुद्धा महिला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाला संशय आला. जंगल परिसरात दुपारी ४ वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरू केली असता, मीरा कोवे यांचा मृतदेह आढळला. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर एकट्याच ओढत होत्या संसार
मीरा कोवे यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला, तर दोन वर्षापूर्वी धाकट्या अविवाहित मुलानेही आजारपणात प्राण सोडले. मीरा कोवे या सून व दोन लहान नाती यांच्यासह राहात होत्या. जेमतेम दीड एकर शेतीवर त्यांची गुजराण होती. त्यामुळे पती, दोन मुलांच्या जाण्याचे दुःख पचवत त्या मोलमजुरी व हंगामात मोहफुले, मोह टोळी वेचणी करून कुटुंबाचा गाडा हाकत.


चालू वर्षातील दुसरी घटना

  • चालूवर्षी चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे मार्च २०२५ मध्ये वाघाने एका पुरुषाचा बळी घेतला होता.
  • देलोडा जंगलात मीरा कोवे यांनाही वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. चालू वर्षातील व्याघ्रबळीची ही दुसरी घटना आहे.

Web Title: A tiger killed a woman who had gone to collect locusts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.