गाेपाल लाजूरकर
गडचिराेली : रानटी टस्कर हत्तीने छत्तीसगड सीमेलगतच्या घराची भिंत फाेडून आतमध्ये प्रवेश करीत घरातील अन्नधान्य खाल्ले. साेबतच भांडी व अन्य साहित्याची नासधूस केली. ही घटना शनिवार, ९ ऑगस्ट राेजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एटापल्ली तालुक्याच्या मंजिगड टाेला येथे घडली.
एटापल्ली तालुक्यातील जारावंडीपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर छत्तीसगड सीमेलगत मंजिगड टोला हे गाव आहे. चामाेर्शी तालुक्यातून गेलेल्या टस्कर हत्तीने याच गावातील रिझनसाय खलको यांच्या घराची भिंत फाेडली. त्यानंतर घराचे छप्पर फाडले, भिंतींना भगदाड पाडले. त्यानंतर घरातील मोबाइल फोडला, भांडी, धान आणि घरातील आवश्यक वस्तूंची नासधूस केली.
हत्तीने हल्ला केल्याने खलकाे हे बेघर झाले आहेत. ऐन पावसाळ्यात त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारची रात्र त्यांना दुसऱ्याच्या घरी आश्रयात काढावी लागली. या घटनेनंतर पीडित रिझनसाय खलको यांनी लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.