मोठी बातमी! २००६ पासून फरार असलेल्या नक्षली दाम्पत्याला हैदराबादमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 08:30 PM2023-02-20T20:30:49+5:302023-02-20T20:31:05+5:30

२००६ पासून फरार असलेल्या नक्षली दाम्पत्याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. 

 A Naxalite couple who have been absconding since 2006 have been arrested in Hyderabad  | मोठी बातमी! २००६ पासून फरार असलेल्या नक्षली दाम्पत्याला हैदराबादमध्ये अटक

मोठी बातमी! २००६ पासून फरार असलेल्या नक्षली दाम्पत्याला हैदराबादमध्ये अटक

googlenewsNext

गडचिरोली : गेल्या २००६ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीत सक्रिय राहून अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या आणि त्यानंतर फरार झालेल्या नक्षली दाम्पत्याला हैदराबाद येथून अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. त्यांच्यावर एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ही कारवाई सोमवारी (दि.२०) करण्यात आली.

सदर नक्षली दाम्पत्यावर वर्षभरापासून गडचिरोली पोलिसांची पाळत होती. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन झनक आणि शिवहरी सरोदे यांच्या नेतृत्वात जवानांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

हैदराबादमध्ये ओळख लपवून वास्तव्य
अटक केलेले नक्षली दाम्पत्य श्यामला ऊर्फ दसरु पुंगाटी आणि तिचा पती टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे हे दोघेही नक्षल दलममधून २००६ मध्ये फरार झाले होते. दलम सोडताना मधुकर हा कमांडर पदावर, तर श्यामला ही सदस्य पदावर कार्यरत होती. कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून ते तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यामध्ये विविध ठिकाणे बदलवत आपली ओळख लपवून राहायचे. सध्या मधुकर हा हैदराबादच्या एका सुरक्षा कंपनीत वॉचमन पदावर, तर श्यामला एका कारच्या शोरुममध्ये काम करत होती.

खून, चकमक, जाळपोळीचे गुन्हे
टुगे ऊर्फ मधुकर कोडापे (४२ वर्ष) हा अहेरी तालुक्यातील बस्वापूर येथील रहीवासी आहे. तो अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाल्यानंतर सिरोंचा, अहेरी, जिमलगट्टा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत होता. परंतू २००६ नंतर तो नक्षल चळवळ सोडून फरार झाला होता. त्याच्यावर ९ खून, ८ चकमकी, २ दरोडे, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व इतर असे एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. श्यामला ऊर्फ जामनी मंगल पुनम (३५ वर्ष) ही छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमक, जाळपोळ, दरोडा व इतर असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

Web Title:  A Naxalite couple who have been absconding since 2006 have been arrested in Hyderabad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.