गडचिराेलीत गुन्हे दाखल असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार
By दिगांबर जवादे | Updated: September 24, 2024 16:44 IST2024-09-24T16:43:42+5:302024-09-24T16:44:40+5:30
Gadchiroli : २५ लाखांचे बक्षीस, पीएसआयच्या हत्येत हाेता सहभाग

A naxalist who was booked in Gadchireli was killed in Chhattisgarh
दिगांबर जवादे
गडचिराेली : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर साेमवारी छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेला व २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी रूपेश मडावी हा ठार झाला आहे. त्याची ओळख पाेलिसांनी पटवली आहे.
छत्तीसगड राज्याच्या सुरक्षा दलांमार्फत अबूजमाड जंगल परिसरात साेमवारी नक्षल शाेध माेहीम राबवली जात हाेती. दरम्यान नक्षलवादी व सुरक्षा जवान यांच्यात चकमक उडाली. यात तीन नक्षलवादी ठार झाले होते. यातील पुरुष नक्षलवादी रूपेश मडावी याची ओळख पटली आहे. गेली वीस वर्षे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी संघटनेत रूपेश मडावी हा कार्यरत हाेता. ताे माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक १० चार कमांडर हाेता. त्याच्यावर ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलिस जवानांच्या हत्येत तो गुन्हेगार आहे. त्याच्याविराेधात दहापेक्षा जास्त हत्या व जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत.