'एक मच्छर...' जगतो फक्त महिनाभर आणि अंडी घालतो हजारावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:45 IST2025-03-10T11:45:04+5:302025-03-10T11:45:41+5:30
Gadchiroli : डासाच्या 'अॅनोफिलिस' या प्रजातीने गडचिरोलीकरांचे जगणे मुश्कील केले

'A mosquito...' lives only for a month and lays thousands of eggs!
संजय तिपाले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अभिनेता नाना पाटेकर यांच्या बहुचर्चित 'यशवंत' सिनेमातील 'एक मच्छर...' हा डायलॉग प्रसिद्ध आहे. याच डासाच्या 'अॅनोफिलिस' या प्रजातीने गडचिरोलीकरांचे जगणे मुश्कील केले आहे. सरत्या वर्षात राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळले, ते शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत. जिल्ह्याला मलेरियाचे 'हॉटस्पॉट' बनविण्यामागे खरा 'व्हिलन'ही हाच डास. त्याच्या डंखाने पाच वर्षांत तब्बल ५० जणांना आपला जीव गमावावा लागला.
कुरखेडा, कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व भामरागड, ही घनदाट जंगल असलेली सहा तालुके मलेरिया प्रभावित आहेत. अवघे २८ दिवसांचे आयुर्मान असलेला 'अॅनोफिलिस' प्रजातीचा हा मादी डास एक हजार अंडी घालतो. गडचिरोली जिल्ह्यात २०२४ मध्ये १,६९१ ग्रामपंचायतींपैकी १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल ७२२ ग्रामपंचायती आरोग्य विभागाने साथरोगाबाबत अतिसंवेदनशील जाहीर केल्या.
या गाांची एकूण २ लाख ७२ हजार ६६ एवढी लोकसंख्या आहे. हिवतापासंदर्भातील चाचण्यांमध्ये ६ हजार ६९८ इतके अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ६ हजार ६८५ जण उपचारानंतर बरे झाले. मात्र, दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू झाला.
१ एप्रिलपासून मलेरियामुक्ती आराखड्याची अंमलबजावणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली मलेरियामुक्तीची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून मलेरियामुक्ती अंमलबजावणी होणार आहे. याकरिता आदिवासी विकास विभागातर्फे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मलेरियामुक्त गडचिरोलीची घोषणा सत्यात उतरेल काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गडचिरोलीतील पाच वर्षांतील मलेरिया रुग्ण व मृत्यू
वर्ष रुग्णसंख्या मृत्यू
२०२० ६४८५ ०६
-२०२१ १२३२६ ०८
२०२२ ९२०५ १३
२०२३ ५८६६ १०
२०२४ ६६९८ १३
७ दिवसात होतो प्रौढ
'अॅनोफिलिस' डासाचे उत्पत्ती ठिकाण हे स्वच्छ पाणी, तसेच घनदाट जंगल आहे. जिल्ह्यात ६८ टक्के वनक्षेत्र असल्याने त्यास उत्पत्तीसाठी अधिक पोषक वातावरण आहे. हा मादी डास जेमतेम २८ दिवस जगतो, जन्मानंतर सात दिवसांतच तो प्रौढ होतो. अंडी घालण्यास सुरुवात करतो, मरण्यापूर्वी एका डासाच्या कुटुंबाचा विस्तार एक हजारांहून अधिक सदस्यांचा असतो, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी सांगितले.
"'अॅनोफिलिस' मादी डास हा मलेरिया वाहक आहे. तो रात्री सक्रिय होतो. ताप आल्यास तो अंगावर न काढता किंवा पुजाऱ्याकडे न जाता शासकीय रुग्णालयांत जाऊन तपासणी करावी. १४ वर्षांखालील मुला- मुलींसह वृद्धांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे."
-डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली