पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 15:49 IST2022-11-15T15:48:58+5:302022-11-15T15:49:51+5:30
इल्लूर येथील घटना, वाचविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न व्यर्थ

पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू
आष्टी (गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील एका अल्पवयीन तरुणीचा गावातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतक तरुणीचे नाव सुप्रिया सुभाष कुबळे (१६ वर्षे) असे आहे.
ही तरुणी सकाळी पाणी आणण्यासाठी अशोक पातर यांच्या घराजवळ असलेल्या शासकीय विहिरीवर गेली होती. ती पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली. विहिरीजवळ असलेल्या लोकांना आवाज आल्याने लोकांनी विहिरीकडे धाव घेऊन त्या तरुणीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. शेवटी तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढावा लागला.
घटनेची माहिती मिळताच, आष्टी पोलिसांनी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत.