लोकमत न्यूज नेटवर्ककोरची (गडचिरोली): अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यात उघडकीस आली. बोगाटोला जंगल परिसरात पुरलेल्या अवस्थेत मिळालेल्या त्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अवघ्या ७२ तासांत यश आले. पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी पत्नी, तिच्या प्रियकरासह पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, जितू कंवर (३०, रा. जठकन्हार ता. डोंगरगड जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असे मयताचे नाव आहे. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या बोगाटोला (ता. कोरची) शिवारातील जंगलात ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या आणि अर्धवट पुरलेल्या स्थितीत ३१ जानेवारी रोजी आढळला होता.
मृताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने क्रूरपणे वार केले होते. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते, परंतु कोरची पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंदवून तपासचक्रे गतिमान केली. त्यानंतर हा मृतदेह जितू कवंर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना एक प्लास्टिकची थैली (चुंगली) आणि जमीन खणण्यासाठी वापरलेल्या टिकासाच्या खुणा आढळल्या. तपासात २० जानेवारी रोजी जांभूळखेडा येथील काही तरुण या भागात टिकास घेऊन फिरत होते, अशी माहिती सहायक निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. याच धाग्यावरून त्यांच्या पथकाने संशयित प्रियकर शानू पठाण याला ताब्यात घेतले व नंतर हत्येचा हा थरार समोर आला.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक गोकुलराज जी, एम. रमेश, उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक मुकुंद देशमुख, विकास चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
हे आहेत आरोपी
पत्नी सोनाली कंवर (२५, रा. डोंगरगड, छत्तीसगड) प्रियकर शानू पठाण (३६), पुंकेश बोरकर (३२), चंद्रशेखर गुज्जेवार (२७) व धनपाल मडावी (२१, सर्व रा. जांभूळखेडा ता. कुरखेडा) यांचा आरोपींत समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
असा रचला मृत्यूचा सापळा
आरोपी महिला सोनाली जितू कंवर (रा. डोंगरगड, छत्तीसगड) हिचे जांभूळखेडा येथील शानू पठाण याच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती जितू कंवर (३०) हा त्यांच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचला गेला.२ फेब्रुवारी रोजी सोनालीने पतीला कोरची तालुक्यातील खुर्शीपार येथे माहेरी बोलावले. तिथून परत डोंगरगडला जात असताना बोगाटोला जंगलात पूर्वनियोजित कटानुसार प्रियकर शानू आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून जितूची निघृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडला.
प्रेमविवाहाचा रक्तरंजीत शेवट
- दरम्यान, सोनाली व जितू यांनी सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. जितू मजुरीकाम करायचा. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली होती. मोठा मुलगा पाच तर छोटा मुलगा चार वर्षांचा आहे.
- शानू पठाण हा खासगी प्रवासी वाहतूक करतो. माहेरी येता-जाताना सोनालीची त्याच्याशी ओळख झाली अन् त्याच्या प्रेमात ती वाहवत गेली. शानू पठाणची तिच्या आयुष्यात एंट्री झाल्यावर पती-पत्नीत खटके उडू लागले, यातून ज्याच्याशी लग्नगाठ बांधली, त्यालाच संपविण्याचा कट सोनालीने रचला.
- यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अर्धवट राहिले. वडील गेले, आईला अटक झाली, त्यामुळे या दाम्पत्याचे दोन चिमुकली भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखे झाले.
Web Summary : In Gadchiroli, a wife and her lover murdered her husband, who was an obstacle to their affair. Police arrested the wife, lover, and three accomplices. The victim was killed in a forest after being lured there under false pretenses.
Web Summary : गढ़चिरोली में, एक पत्नी और उसके प्रेमी ने अपने पति की हत्या कर दी, जो उनके संबंध में बाधा था। पुलिस ने पत्नी, प्रेमी और तीन साथियों को गिरफ्तार किया। झूठे बहाने से बुलाकर जंगल में ले जाकर शिकार को मार डाला गया।