आदिवासींचे देवदूत... डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताने प्रिस्किप्शन लिहिणारे डॉक्टर
By संजय तिपाले | Updated: July 16, 2024 13:33 IST2024-07-16T13:32:03+5:302024-07-16T13:33:25+5:30
Gadchiroli : नक्षलग्रस्त लाहेरीत मलेरियाग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अशीही रुग्णसेवा

A doctor turns out to be an angel for these tribals
गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडणारे चित्र नेहमीच पाहावयास मिळते, पण प्रतिकूल परिस्थितीतही काही वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भागात निष्ठेने रुग्णसेवा करुन आदिवासींसाठी देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय १५ जुलैला भामरागड तालुक्यातील लाहेरीत आला. स्वत: मलेरियाग्रस्त असल्याने एका हाताला सलाईन असताना दुसऱ्या हाताने प्रिस्क्रिप्शन लिहून कर्तव्यपूर्ती करतानाचे एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
डॉ. संभाजी देवराव भोकरे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. मूळचे हिंगोलीचे रहिवासी असलेले डॉ. भोकरे हे गेल्या काही वर्षांपासून भामरागडसारख्या अतिदुर्गम व नक्षलप्रभावित सेवा बजावत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मलेरिया रुग्ण आहेत. भामरागड तालुका अधिक प्रभावित आहे. डॉ. भोकरे यांनाही मलेरियाचे निदान झाले. त्यामुळे १५ जुलै रोजी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच स्वत:ला सलाईन लावून उपचार घेत होते. याचवेळी आदिवासी रुग्ण उपचारासाठी आले. यावेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाह्य रुग्ण कक्षात खुर्चीत बसून डाव्या हाताला सलाईन घेत असलेल्या डॉ. भोकरे यांनी उजव्या हाताने त्यांची तपासणी करुन प्रिस्क्रिप्शन लिहिले. स्वत: उपचार घेत असताना इतरांवर उपचार करणाऱ्या डॉ. भोकरे यांनी दाखवलेल्या तत्परतेची सध्या चर्चा आहे.
कधी झोळीतून, कधी नाल्यातून पायवाट...
भामरागड तालुक्यात शेजारील छत्तीसगडचे काही रुग्ण झोळीतून तर कधी कावड करुन दवाखान्यात येत असतात. पक्के रस्ते नसल्याने काही ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचत नाहीत तर पावसाळ्यात नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे नेहमीचेच चित्र आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत बंगाडी गावात तापेने फणफणाऱ्या मुलीला पित्याने खांद्यावर बसवून नाल्यातून वाट काढत आरोग्य केंद्रात आणल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. त्यावरुन एकीकडे आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असताना डॉक्टरच्या सेवानिष्ठेचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.