जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार!
By गेापाल लाजुरकर | Updated: May 21, 2025 19:29 IST2025-05-21T19:27:23+5:302025-05-21T19:29:20+5:30
Mumbai: जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात झाल्याने गुराख्याचा जागीच मृत्यू झाला.

जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार!
गोपाल लाजूरकर, गडचिरोली: जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात झाल्याने गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आरमोरी तालुक्याच्या वनखी येथील खाेब्रागडी नदी काठपरिसरात बुधवार, २१ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. केवळराम कारूजी गेडाम (वय, ५५) असे गुराख्याचे नाव आहे.
केवळराम गेडाम हे नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी नदीकाठ परिसरात गेले होते. गुरे चारत असतानाच दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह वातावरणात बदल झाला. काही वेळाने पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, वज्राघात झाल्याने केवळराम गेडाम यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती सहकाऱ्यांनी गावात दिली. त्यानंतर आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, आरमोरी तालुक्यातीलच डोंगरसावंगी येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन बैल ठार झाले.