९९ टक्के खर्चाची नोंद
By Admin | Updated: March 2, 2015 01:18 IST2015-03-02T01:18:21+5:302015-03-02T01:18:21+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशु वैद्यकीय संस्थेंतर्गत विविध उपक्रम योजना योजना राबवून पशुधनाचा सर्वांगिण विकास करीत असल्याचा दावा जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

९९ टक्के खर्चाची नोंद
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशु वैद्यकीय संस्थेंतर्गत विविध उपक्रम योजना योजना राबवून पशुधनाचा सर्वांगिण विकास करीत असल्याचा दावा जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. याशिवाय या विभागाच्या लेखी पशुधन विकासाच्या सर्व योजनांवर ९९ टक्के निधी जानेवारी २०१५ अखेरपर्यंत खर्च झाल्याची नोंद आहे. मात्र दुर्गम भागातील अनेक शेतकरी व पशुपालक अद्यापही जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे दिसून येते.
राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे अनेक विभाग शासकीय योजना प्रभाविपणे राबविल्याचा कांगावा करून १०० टक्के निधी खर्च केल्याचे कागदोपत्री बऱ्याचदा दाखवितात. मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळत नसल्याने तळागाळातील गरजू नागरिक विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत बिगर आदिवासी, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरूस्ती व बांधकाम करण्यात येते. आदिवासी उपययोजनेंतर्गत जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला पशुवैद्यकीय इमारत बांधकामासाठी डीपीडीसीमधून १०० लक्ष रूपयाचा नियतव्यय प्रस्तावित होता. तेवढीच अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून १०० लक्ष रूपयाचा निधी प्रत्यक्षात बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाला. पशुसंवर्धन विभागाने मागील महिन्यापर्यंत ६० लक्ष व चालू महिन्यात ४० लक्ष असे एकूण १०० लक्ष रूपये खर्च झाले असून या खर्चाची टक्केवारी १०० असल्याची नोंद घेतली आहे. या निधीतून गोविंदगाव, भाडभिडी, दोलंदा, येंगलखेडा, रांगी व सुरसुंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दाखविले आहे. याच योजनेंतर्गत शेळी गटाच्या वाटपासाठी २४ लक्ष रूपयांचा निधी बीडीएस प्रणाली उपलब्ध झाला. यातून ७० गटांना शेळींचे वाटप करण्यात आले असून १०० टक्के निधी खर्च झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. सदर निधी पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आल्याची नोंद आहे.
दुधाळू जनावर गट वाटप व खाद्य वाटपासाठी ३६ लक्ष
विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे गट वाटप व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप करण्यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाला ३६ लक्ष रूपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. या विभागाला या कामासाठी बीडीएस प्रणालीवर दुधाळू जनावरांच्या गट वाटपासाठी ३० लक्ष व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप करण्यासाठी ६ लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण ३६ लक्ष रूपये फेब्रुवारी अखेरपर्यंत पंचायत समितीस्तरावर वितरित केला असल्याची नोंद जि.प. पशुसंवर्धन विभागाने घेतली असून खर्चाची टक्केवारी १०० दाखविली आहे. निधी मिळूनही पं.स. प्रशासन योजनेच्या अंमलबजावणीत मागे असल्याचे दिसून येते.