दुर्गम भागातील ९५ युवांना मिळाला राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:34+5:302021-03-17T04:37:34+5:30
गडचिराेली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल असल्याने येथे राेजगाराच्या फारशा संधी नाहीत. माेठे उद्याेगधंदे नाही. त्यामुळे बेराेजगार ...

दुर्गम भागातील ९५ युवांना मिळाला राेजगार
गडचिराेली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल असल्याने येथे राेजगाराच्या फारशा संधी नाहीत. माेठे उद्याेगधंदे नाही. त्यामुळे बेराेजगार युवक हैराण हाेत असतात. ही बाब लक्षात घेऊन पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या संकल्पनेतून पाेलीस दलाच्या वतीने राेजगार मेळावा ॲप तयार करण्यात आला. या ॲपमध्ये बेराेजगार युवक-युवतींनी आपल्या नावाची नाेंद करावी, असे आवाहन पाेलीस विभागाने केले हाेते. जवळपास ५ हजार युवक-युवतींनी या राेजगार मेळावा ॲपमध्ये आपल्या नावाची नाेंदणी केली. त्यानंतर गडचिराेली पाेलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने ऑटाेमाेबाईल व हाॅस्पिटिलिटीच्या प्रशिक्षणासाठी युवकांची निवड करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात पाेलीस मुख्यालयातील एकलव्य धाममध्ये युवक-युवतींना नियुक्ती पत्र व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी राेजगार प्राप्त युवक-युवती तसेच राेजगार व प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत असलेल्या प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व नागरी कृती शाखेच्या अधिकाऱ्यांचे काैतुक केले आहे.
बाॅक्स ...
हाॅटेल मॅनेजमेंटच्या ७२ जणांना संधी
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव, यवतमाळ यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२१ मध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ७२ युवक-युवतींना मुलाखतीद्वारे निवड करून त्यांना माेठ्या शहरातील हाॅटेलमध्ये नाेकरी मिळवून देण्यात आली. मुंबई, गाेवा, महाबळेश्वर, पुणे, नागपूर, लाेणावळा आदी ठिकाणी ७ हजार ते १० हजार रुपये मासिक वेतन तसेच निवास व भाेजनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी राेजगार देण्यात आला.
बाॅक्स ...
ऑटाेमाेबाईलच्या २३ युवकांना राेजगार प्राप्त
ऑटाेमाेबाईलचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २३ युवकांना कर्नाटक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी मासिक १२ हजार रुपये वेतनावर नाेकरीची संधी मिळवून देण्यात आली. पाेलीस विभागाच्या पुढाकाराने राेजगार मिळालेल्या या युवक-युवतींच्या चेहऱ्यावर हास्य झळकले आहे.