तज्ज्ञांअभावी ९५१ रूग्ण रेफर
By Admin | Updated: July 1, 2014 23:30 IST2014-07-01T23:30:41+5:302014-07-01T23:30:41+5:30
गरिबांसह इतर नागरिकांना उपचार घेता यावे म्हणून सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले असले तरी सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही.

तज्ज्ञांअभावी ९५१ रूग्ण रेफर
आरमोरी : गरिबांसह इतर नागरिकांना उपचार घेता यावे म्हणून सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले असले तरी सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही. आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून २०१३-१४ या वर्षात विविध प्रकारच्या आजारांचे ९५१ रूग्ण तज्ज्ञाअभावी दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आले आहेत. त्यामुळे आरमोरी उपजिल्हा रूग्णालय केवळ नावालाच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरमोरी उपजिल्हा रूग्णालय वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आले आहे. जन्मत: बाळ दगावणे, योग्य उपचाराचा अभाव, डॉक्टरांचे रूग्णांच्या नातेवाईकास गैरव्यवहार आदी प्रकरणांचा यात समावेश आहे. उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग, वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ, बधीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, वैद्यकीय बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ अशी अनेक पदे आहेत. मात्र रूग्णांना आकस्मिक वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णालयातील सर्व पदे केवळ नाममात्र असल्याचे उघड झाले आहे. रूग्णालयातील सर्व पदे तज्ज्ञ डॉक्टरांची असून केवळ एमबीबीएस डॉक्टरांची पदे भरण्यात आली आहेत. अधिक आजार असलेले रूग्ण, गरोदर स्त्री, अपघात रूग्ण यांना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. मात्र रूग्णालयात रोग, शस्त्रक्रिया, प्रसूती या करिता तज्ज्ञ डॉक्टर नाही. रूग्णालयात गंभीर आजाराचा अथवा आकस्मिक रूग्ण आल्यास रूग्णांना दुसऱ्या दवाखान्यात रेफर केले जाते. परंतु रूग्णांची देखभाल दवाखान्यात केली जाते. परिणामी अनेक रूग्ण दुसऱ्या रूग्णालयात रेफर करीत असतांना दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत शासनाने रूग्णालयातील अनेक पदे तज्ज्ञ डॉक्टरांसाठी राखीव ठेवली आहेत. मात्र कोणताही तज्ज्ञ डॉक्टर शासकीय रूग्णालयात नोकरी करण्यास तयार नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सदर पदे भरण्याकरिता केवळ एमबीबीएस डॉक्टरांची निवड करून तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरली जात आहेत. यात एमबीबीएस डॉक्टर हे शैक्षणिक प्रॅक्टीस करण्याकरिता रूग्णालयात नियुक्त केले जातात. मात्र त्यांना तज्ज्ञाचा दर्जा देऊन रिक्त जागा भरली जाते. हे उघड झाले आहे. अधिक गंभीर स्वरूपाचे रूग्ण रूग्णालयातून रेफर करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो असे डॉ. वाय. जी. मोरे यांचे म्हणणे आहे.
२०१३-१४ या वर्षात गरोदर स्त्री रूग्ण २६४, १९ नवजात बालक (गंभीर) लहान मुले ४५ व इतर ६२३ रूग्ण असे एकूण ९५१ रूग्ण तज्ज्ञ डॉक्टरांअभावी दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आलेले आहेत. तसेच ४५ हजार ८२५ बाह्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४ हजार ४०४ रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यात आले. ३६४ स्त्रियांची प्रसूती व १२ स्त्रियांची सिझरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. (प्रतिनिधी)