८४ अंगणवाडी केंद्र इमारतींचे काम अपूर्ण

By Admin | Updated: December 16, 2015 01:40 IST2015-12-16T01:40:34+5:302015-12-16T01:40:34+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०१०-११ या वर्षात संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४३५ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले.

84 Anganwadi center buildings work incomplete | ८४ अंगणवाडी केंद्र इमारतींचे काम अपूर्ण

८४ अंगणवाडी केंद्र इमारतींचे काम अपूर्ण

दिरंगाई : ६८१ अंगणवाडी केंद्र भाड्याचाच खोलीत

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०१०-११ या वर्षात संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४३५ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत ३२० अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून तब्बल ८४ केंद्राच्या इमारतीचे काम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. अंगणवाडी इमारत बांधकामात प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत १२ तालुक्याच्या ठिकाणी १२ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कार्यालय असून या साऱ्याच ठिकाणी प्रभारी प्रकल्प अधिकारी आहेत. २०१०-११ पासून जिल्ह्यात अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला एकूण १९ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी मिळाला होता. यापैकी अंगणवाडी केंद्र इमारतीच्या बांधकामावर आतापर्यंत १५ कोटी ५९ लाख ९६ हजार २८८ रूपये खर्च झाले आहेत. उर्वरित ५६ लाख ३ हजार ७१२ रूपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे.
अपूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये एटापल्ली तालुक्यात ४, भामरागड तालुक्यात १४, अहेरी १२, कोरचीत ३, आरमोरी ३, चामोर्शी २८, धानोरा २, गडचिरोली २ व सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १६ अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. शिवाय या बालकांना नियमित पोष्टिक आहार दिला जातो. तसेच गरोदर व स्तनदा मातांना योग्य पोष्टिक आहार देऊन त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले जाते. कुपोषण निर्मुलनाचे महत्त्वपूर्ण कार्यही अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून केले जाते. दर महिन्याला अंगणवाडी केंद्रात दाखल असलेल्या बालकांचे वजन घेऊन त्याची नोंद केल्या जाते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १७७१ मोठ्या अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २८९ अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी केवळ १ हजार ६०८ अंगणवाडी केंद्रांसाठी प्रशासनाची स्वत:ची इमारत आहे. तब्बल ६८१ अंगणवाडी केंद्रांना अद्यापही स्वतंत्र इमारत नसल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी या अंगणवाडी केंद्रात दाखल असलेले बालके तसेच परिसरातील गरोदर व स्तनदा मातांना प्रशस्त इमारतीअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

जागेअभावी ३१ कामे रद्द; साडेतीन कोटी शासनाकडे गेले परत
जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत २०१०-११ मध्ये एकूण ४३५ अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र अनेक गावात अंगणवाडी केंद्रासाठी प्रशासनाला जागा मिळत नसल्याची बाब उजेडात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या अनेक ठिकाणच्या जागांवर खासगी लोकांनी आपली मालकी दाखविली आहे. तसेच अनेक ठिकाणच्या जागा वादग्रस्त आहे. तसेच इतर कारणे आहेत. या साऱ्या बाबींमुळे जि.प. प्रशासनाला ३१ अंगणवाडी केंद्र इमारतीचे काम रद्द करण्यात आले. त्यामुळे जि.प. प्रशासनाकडून तब्बल ३ कोटी ४० लाख रूपयांचा निधी राज्य शासनाकडे परत गेला आहे. आधीच नक्षलग्रस्त दुर्गम गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. मात्र योग्य नियोजनाअभावी निधी परत करण्याची पाळी येते.

Web Title: 84 Anganwadi center buildings work incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.