६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ
By Admin | Updated: September 8, 2016 01:24 IST2016-09-08T01:24:30+5:302016-09-08T01:24:30+5:30
राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ
स्पर्धांपासून वंचित राहणार : केवळ ४६ मंडळांनी केली धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी
गडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित सार्वजनिक मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६२५ सार्वजनिक मंडळांपैकी ४६ मंडळांनीच गडचिरोली येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली आहे. उर्वरित ६३९ मंडळांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सदर सार्वजनिक गणेश मंडळे शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहणार आहेत.
यावर्षी महाराष्ट्र शासनाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १२५ वी जन्म शताब्दी दिवस साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये व्यसनमुक्ती, बेटी बचाव, स्वदेशी, साक्षरता, जलसंवर्धन आदी चार विषयांवर गणेश मंडळांना स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या १६० वे जयंती वर्ष सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या जगप्रसिद्ध उद्गारचे चालू वर्ष शतक महोत्सवी वर्ष आहे.
गडचिरोली जिल्ह्यात यंदा ९ पोलीस उपविभाग मिळून एकूण ४९३ सार्वजनिक मंडळांमार्फत गणेशोत्सव सुरू आहे. याशिवाय १९२ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत असून या गावांमध्येही मोठ्या उत्साहात एकात्मतेने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. एकूण ६८५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ ४६ मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय गडचिरोली यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर करून रितसर नोंदणी केली आहे. तर एका सार्वजनिक गणेश मंडळाचा अर्ज धर्मदाय आयुक्त कार्यालयात शिल्लक आहे. या मंडळालाही संबधित कार्यालयाकडून परवानगी पत्र देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करून नोंदणी करणे गरजेचे होते. शांतता समितीच्या बैठकीत धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र ६०० वर सार्वजनिक गणेश मंडळांनी केवळ आपल्या गावालगतच्या पोलीस ठाण्यात नोंदणी केली आहे. मात्र या मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे या मंडळांना राज्य शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी पुरस्कारालाही सदर मंडळे मुकणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)