५४ महिला पोलीस बनल्या आरोग्य सेविका

By Admin | Updated: December 17, 2015 01:31 IST2015-12-17T01:31:19+5:302015-12-17T01:31:19+5:30

नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा पोलीस विभागाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

54 women police constables became health care worker | ५४ महिला पोलीस बनल्या आरोग्य सेविका

५४ महिला पोलीस बनल्या आरोग्य सेविका

मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने प्रशिक्षण केले पूर्ण
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा पोलीस विभागाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकीकडे चळवळीतील नक्षलवादी आदिवासी बांधवांच्या विकासात खोडा निर्माण करीत असले तरी अतिदुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मुलभुत सुविधा पोहोचविण्याचा ध्यास पोलिसांनी घेतला आहे. यात महिला पोलीससुध्दा मागे नाही. याच ध्यासातून अतिदुर्गम भागात कार्यरत असलेले पोलीस आणि गावातील नागरिकांना वेळेवर प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी गडचिरोलीतील महिला पोलीस आरोग्य सेविका बनल्या आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ५४ महिला पोलिसांनी नुकतेच वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
१४ हजार ४०० चौ. कि.मी क्षेत्रफळ असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८० टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी अतिदुर्गम जंगलग्रस्त भागात पोलीस स्टेशन, उप-पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्र कार्यरत आहेत. येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही किंवा त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. एवढेच नाही तर जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवितांना नक्षलवाद्यांकडून ब्लास्ट किंवा गोळीबार झाला तर जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी त्यांना त्वरित डॉक्टर उपलब्ध होत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी व जखमी जवानांचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील महिला पोलिसांना प्राथमिक वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे ‘गृह आधारीत देखभाल कार्यकर्ता’ या प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील महिला पोलिसांनी जवळपास एक महिन्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले. यात १० ते १२ दिवस वैद्यकीय अभ्यास आणि १८ दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रात्यक्षिक करण्यात आले. सदर प्रशिक्षणात महिला पोलिसांना प्रथमोपचार, रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईन कशी लावावी. तसेच सर्दी, खोकला, ताप आणि मलेरिया या आजारांवर प्रथमोपचार कसा करावा. स्फोटात किंवा बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित वैद्यकीय सेवेचा लाभ देऊन त्यांना जखमी अवस्थेतून कसे बाहेर काढावे, याबाबत डॉ. रामटेके यांनी महिला पोलिसांना मार्गदर्शन केले. याबाबतचे प्रात्यक्षिक महिला पोलिसांकडून करून घेण्यात आले. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन, उप-पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यासोबतच आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम आणि आरोग्य विषयक समस्यांचे प्रथमोपचाराबाबत या आरोग्य सेविका मार्गदर्शन करणार आहेत. एवढेच नव्हे तर आजुबाजुच्या गावातील नागरिकांना आजाराने जडले असेल आणि वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसेल तर त्यांनासुध्दा या महिला पोलीस आरोग्य सेविका म्हणून प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

या गावात मिळणार महिला आरोग्य प्रशिक्षकांची मदत
सदर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला पोलिसांमध्ये मरपल्ली, असरअल्ली, रेगडी, रेंगुठा, सिरोंचा, देसाईगंज, गॅरापत्ती, हालेवारा, कोटगुल, मुलचेरा, धानोरा, सावरगाव, आरमोरी, कारवाफा, धोंडराज, झिंगानूर, हेडरी, बोलेपल्ली, गट्टा (जा.), कोरची, ब्राह्मणी, कुरखेडा, बुर्गी येमली, एटापल्ली, मुरुमगाव, बेडगाव, पुराडा, चातगाव, राजाराम (खा.), पेंढरी, येरकड, कसनसूर, चामोर्शी, मालेवाडा आणि गोडलवाही सह एटीएस गडचिरोली येथील एकूण ५४ महिला पोलिसांचा समावेश आहे.

Web Title: 54 women police constables became health care worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.