५२७ जागा रिक्त
By Admin | Updated: July 28, 2016 01:54 IST2016-07-28T01:54:24+5:302016-07-28T01:54:24+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गरीब मुलांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश ....

५२७ जागा रिक्त
१०० अॅडमिशन झाल्या : २५ टक्के मोफत प्रवेश योजना फसली
गडचिरोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गरीब मुलांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळेत मोफत प्रवेश देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते. यंदा २५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत ६२७ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे होते. आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून अद्यापही या योजनेतील ५२७ जागा रिक्त आहेत. मोफत प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे यावरून दिसून येते.
शिक्षणाच्या मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना कार्यान्वित केली. १ एप्रिल २०१० पासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सर्व मागासवर्गीय व अपंग विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी इयत्ता पहिलीत या योजनेंतर्गत मोफत प्रवेश दिल्या जातो. यंदा सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील ६६ विनाअनुदानित शाळांनी नोंदणी केली. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. एकदा इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला इयत्ता आठवीपर्यंत त्याच विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. अनेक विनाअनुदानित शाळांची प्रवेश शुल्काची रक्कम प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी सदर योजना राज्य शासनाने शिक्षण विभागामार्फत कार्यान्वित केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मराठी माध्यमांच्या शाळेत एकही प्रवेश नाही
२५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने यंदा मराठी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्येही इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे होते. यंदा इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेत १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र मराठी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांचा या योजनेंतर्गत प्रवेश झाला नाही. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज व ओढ असल्याने पालकांनी मराठी माध्यमांच्या शाळांकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे.