५० टक्के बंधाऱ्यांच्या फळ्या झाल्या गायब
By Admin | Updated: September 2, 2015 01:06 IST2015-09-02T01:06:37+5:302015-09-02T01:06:37+5:30
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत शेती सिंचनासाठी जिल्हाभरात एकूण ६५८ कोल्हापुरी व साठवण

५० टक्के बंधाऱ्यांच्या फळ्या झाल्या गायब
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत शेती सिंचनासाठी जिल्हाभरात एकूण ६५८ कोल्हापुरी व साठवण बंधारे आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत अधिक पाऊस झाला. मात्र पाण्याअभावी अद्यापही रोवणीशिवाय हजारो हेक्टर जमीन पडीत आहे. ६५८ बंधाऱ्यांमध्ये एकूण फळ्यांची संख्या ५ हजार ५०३ आहे. यापैकी २ हजार ७६३ बंधाऱ्यांच्या फळ्या गायब झाल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट कोसळले आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या तब्बल ६५८ कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्याची एकूण प्रकल्पीय सिंचन क्षमता १४२९४.१५ हेक्टर असून जीवंत साठवण क्षमता ०.३५ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या ६५८ बंधाऱ्यामध्ये ०.२० दशलक्ष घनमीटर जलसाठा असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या अर्ध्या अधिक बंधाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक बंधारे लिकेज आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याची या बंधाऱ्यात साठवणूक होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, अर्ध्या बंधाऱ्याच्या फळ्या गायब झाल्यामुळे अनेक बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दुरवस्था झालेल्या व फळ्या गायब झालेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन केले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागील आठवड्यात बैठक झाली. त्यानंतर जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दुरूस्त करावयाच्या बंधाऱ्याची यादी व नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सद्यस्थितीत अर्ध्या बंधाऱ्यांना २ हजार ७६३ फळ्या बसविण्यासाठी त्याची किरकोळ दुरूस्ती करण्यासाठी ७ कोटी ५१ हजार रूपयांची आवश्यकता आहे. तशी माहितीही जि.प. लघु पाटबंधारे विभागाकडून सादर करण्यात आली आहे. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतरच जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यांची किरकोळ दुरूस्ती व नव्या फळ्या बसविण्याचे काम होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
काय म्हणते प्रशासनाची पावसाची आकडेवारी?
४गतवर्षी २०१४ च्या खरीप हंगामात जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ७०८.९ पाऊस प्रत्यक्षात झाला व त्याची टक्केवारी ६२.३ आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत ८३३.६ प्रत्यक्षात पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ७३.३ आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत १२५ मिमी सरासरी पाऊस अधिक झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. मात्र दुष्काळाची भिषणता पाहता अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या पावसाच्या आकडेवारीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
जलयुक्त शिवारचा फायदा झाला काय?
४नव्या भाजप-सेना प्रणित राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात सुरू केले. या अभियानांतर्गत १५२ गावांची निवड करून १५०० पेक्षा अधिक जलसंधारणाची कामे घेण्यात आली. त्यापैकी निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झाली असून कोट्यवधी रूपये खर्च झाले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामातून यंदा शेतकऱ्यांना मुळीच फायदा झाला नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
ग्रामपंचायत व पाणी वाटप समित्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर
४जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दरवर्षी १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान बंधाऱ्यांवर फळ्या बसवून पाणी अडविण्याचे काम ग्रामपंचायत तसेच गाव पातळीवरील समित्यांमार्फत केले जाते. मात्र अर्ध्या बंधाऱ्यांचे २ हजार ७६३ फळ्या चोरी गेल्यामुळे आता पावसाचे पाणी अडवायचे कसे, असा प्रश्न विभागासमोर निर्माण झाला आहे. बंधाऱ्यावरील फळ्या गायब झाल्याने ग्रामपंचायत व पाणी वाटप समित्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.