५ लाख ६७ हजार रोपांची होणार लागवड

By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:38+5:302016-06-07T07:39:38+5:30

१ ते ७ जुलै या कालावधीत होणाऱ्या वन महोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार वृक्षांची लागवड केली

5 lakh 67 thousand seedlings will be planted | ५ लाख ६७ हजार रोपांची होणार लागवड

५ लाख ६७ हजार रोपांची होणार लागवड

गडचिरोली : १ ते ७ जुलै या कालावधीत होणाऱ्या वन महोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व जनतेने या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकरी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच विविध आस्थापनांनी या महोत्सवात सहभाग घ्यावा. त्यांना किफायतशीर दरात रोपे उपलब्ध करुन दिली जातील. राज्यातील महत्वाकांक्षी अशा दोन कोटी झाडे लावण्याचा हा उपक्रम गडचिरोलीत यशस्वी व्हावा यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्याला ४ लाख ६९ हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दीष्ट प्राप्त आहे. मात्र त्याही पलिकडे जाऊन ५ लाख ६७ हजार झाडे लावण्याची तयारी विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे नायक यांनी सांगितले.
ग्रामीण भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तसेच विविध शासकीय कार्यालये तसेच शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात ही लागवड करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, नगरपंचायती तसेच इतर शासकीय विभागांचा या कामी सहभाग प्राप्त होत आहे. पर्यावरण संवर्धनात नागरिकांनीही आपला वाटा उचलावा आणि आपल्या घराजवळ तसेच शेताच्या बांधावर झाडे लावावीत यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे.
या लागवडीसाठी मुख्य रोपवाटीका, सेमाना संकुल तसेच महत्वाच्या चौकात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत आधिक माहितीसाठी नागरिकांनी सहाय्यक वनसंरक्षक जे.एल. शिंदे किंवा लागवड अधिकारी काळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जयंत पिंपळगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 5 lakh 67 thousand seedlings will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.