जिल्ह्यात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधत ४८५ नवउद्योगांना मिळाली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:28 IST2025-04-05T16:27:48+5:302025-04-05T16:28:28+5:30
Gadchiroli : कोणत्या बँकेने किती प्रस्ताव मंजूर केले ?

485 new industries received approval in the district, achieving 100 percent target.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली असून, जिल्ह्यातील ४८५ नवउद्योजकांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश गायकवाड यांच्या माहितीनुसार, या नवउद्योजकांना वित्तपुरवठा करण्यात आला असून, त्यांना अनुदान (सबसिडी) देखील मिळवून देण्यात जिल्हा अग्रेसर ठरला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नियमितपणे बैठका घेऊन योजनेची प्रगती तपासली. बँकांनीदेखील त्यांना दिलेल्या उद्दिष्टांचे वेळेत पालन केले.
गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन
जिल्ह्यात स्थानिक व बाहेरील उद्योजकांसाठी गुंतवणुकीस पोषक वातावरण आहे. बँकांकडून उद्योगांसाठी आवश्यक असलेली पतनिर्मिती तत्परतेने करण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी सांगितले.
कोणत्या बँकेने किती प्रस्ताव मंजूर केले ?
विविध बँकांनी या योजनेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला असून, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बैंक ऑफ इंडियाने प्रत्येकी १२९ प्रकरणे, बँक ऑफ इंडियाने ८६, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६४ आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५२ प्रकरणांना मंजुरी दिली आहे.