४८४ विद्यार्थी आजारग्रस्त
By Admin | Updated: January 3, 2017 00:56 IST2017-01-03T00:56:56+5:302017-01-03T00:56:56+5:30
अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने डिसेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात सहा आश्रमशाळा व एक अंगणवाडी केंद्रात ...

४८४ विद्यार्थी आजारग्रस्त
सहा आश्रमशाळांमध्ये मोहीम : अहेरी उपजिल्हा रूग्णालयाने केली ७५० बालकांची चिकित्सा
अहेरी : अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने डिसेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात सहा आश्रमशाळा व एक अंगणवाडी केंद्रात एकूण ७५० विद्यार्थ्यांची दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४८४ विद्यार्थी विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले.
तालुक्यातील कमलापूर येथील श्रीगुरूदेव आश्रमशाळा, पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळा, देवलमरी येथील भगवंतराव आश्रमशाळा, अहेरी येथील मुला-मुलींच्या दोन शासकीय आश्रमशाळा, गडअहेरी येथील अंगणवाडी केंद्र, अहेरी येथील सरस्वती शिशू विद्यालयात अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीप्ती कोहळे, परिचारिका देवकी सुनतकर, शालू दुर्गे यांनी विद्यार्थ्यांची विविध तपासणी केली व आवश्यक औषधोपचार केला.
तपासणीनंतर वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय बालस्वास्थ्य पथकाचे डॉ. रूबिना अंसारी, डॉ. मनीष शेंडे, डॉ. दीपक मडावी, डॉ. उज्ज्वला आत्राम, औषधी निर्माता गेमचंद गोंगले, स्नेहलता धाडसे, संदर्भसेवा देणार आहेत. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे समुपदेशक मनीषा कांचनवार यांनी वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक अत्याचार, सिकलसेल आजाराबाबत माहिती, तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोबाईल युनिट, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य केंद्राचे पथक तसेच रूग्णालयाच्या वैैद्यकीय चमूने विशेष सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
२१८ विद्यार्थी सिकलसेलग्रस्त
उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील सहा आश्रमशाळा व एका अंगणवाडी केंद्रात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत रक्तक्षयाचे २१९, मलेरियाचे २६, सिकलसेलचे २१८ तर इतर आजाराचे २१ रूग्ण असे एकूण ४८४ विद्यार्थी आजारग्रस्त आढळून आले. या विद्यार्थ्यांना त्यांना जडलेल्या आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजाराबाबत घ्यावयाची काळजी तसेच इतर बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आला.