४३ वर्षांची प्रतीक्षा संपली; गडचिरोलीला मिळाले पोस्ट कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:42 IST2025-07-30T14:40:52+5:302025-07-30T14:42:51+5:30

Gadchiroli : चंद्रपूरमधून गडचिरोली डाक विभाग वेगळा

43 years of wait is over; Gadchiroli gets a post office | ४३ वर्षांची प्रतीक्षा संपली; गडचिरोलीला मिळाले पोस्ट कार्यालय

43 years of wait is over; Gadchiroli gets a post office

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून स्वतंत्र झालेल्या गडचिरोली जिल्ह्याला तब्बल ४३ वर्षांनंतर स्वतंत्र स्वतंत्र डाक विभाग म्हणून मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या टपाल विभागाने २८ जुलै रोजी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून लवकरच गडचिरोलीमध्ये स्वतंत्र मुख्य पोस्ट कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक टपाल सेवा अधिक गतिमान व सुलभ होणार आहे.


यापूर्वी गडचिरोली व चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे चंद्रपूर डाक विभागांतर्गत कार्यरत होते. या विभागात चंद्रपूरचे १५ तर गडचिरोलीचे १२ तालुके होते. यादरम्यान अहेरी, सिरोंचासारख्या अतिदुर्गम भागांपर्यंत सेवा पोहोचवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शिवाय गडचिरोलीच्या नागरिकांना टपाल तक्रारी व योजनांच्या कामांसाठी चंद्रपूरला जावे लागत होते. गडचिरोलीसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनने ही मागणी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने लावून धरली होती.


तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चंद्रपूर व गडचिरोलीचे लोकप्रतिनिधींनाही निवेदने सादर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावे केंद्र सरकारच्या टपाल विभागाने अधिकृत पत्र जारी करून गडचिरोलीला स्वतंत्र डाक विभाग म्हणून मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गडचिरोलीला प्रशासकीय स्वायत्तता लाभणार असून, स्थानिक पातळीवर वेगाने निर्णय घेणे शक्य होणार आहे.


"चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली. तेव्हा पोस्ट विभागाचे विभाजन करण्यात आले नव्हते. गडचिरोली जिल्ह्याच्या चंद्रपूर येथूनच कारभार चालविला जात होता. यांसदर्भात केंद्र, राज्य शासनाकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. आता २८ जुलै रोजी केंद्र शासनाने यासंदर्भात निर्णय घेतल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र मुख्य पोस्ट कार्यालय निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे."
- प्रशांत कन्नमवार, सचिव, भारतीय पोस्टल एम्प्लॉइज असोसिएशन, चंद्रपूर
 

Web Title: 43 years of wait is over; Gadchiroli gets a post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.