४१ क्विंटल मोहफूल जप्त
By Admin | Updated: January 29, 2015 23:06 IST2015-01-29T23:06:47+5:302015-01-29T23:06:47+5:30
रांगीवरून आरमोरीकडे मोहफूल घेऊन जात असलेल्या वाहनाचा २८ जानेवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रांगीजवळ पाठलाग करून वाहन जप्त केले.

४१ क्विंटल मोहफूल जप्त
धानोरा/रांगी : रांगीवरून आरमोरीकडे मोहफूल घेऊन जात असलेल्या वाहनाचा २८ जानेवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रांगीजवळ पाठलाग करून वाहन जप्त केले. या वाहनात ४१ क्विंटल मोहफूल आढळून आले आहे.
दुर्गम भागातील नागरिकांकडून मोहफूल विकत घेऊन सदर मोहफुलाची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी नाक्यावर पाळत ठेवली. मोहफूल घेऊन जात असलेल्या एमएच ३४-एम २१०७ या वाहनाला हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन थांबविले नाही. त्यामुळे वनरक्षक आर. जी. बारसिंगे व वनपाल गोवर्धन यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून वाहन जप्त केले. सदर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील दुर्वेश सुखदेव हुलके यांच्या मालकीचे असून वाहनचालक महेश देवराव कुळमेथे हा फरार आहे. या वाहनाची चौकशी केली असता, वाहनात मोहफुलाचे १०२ पोते आढळून आले. त्यांचे वजन ४१ क्विंटल आहे. वाहनासह मोहफुलाची किंमत १० लाख रूपये होते, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी दीपक चौंडेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. वाहनचालक व मालकावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वन परिक्षेत्राधिकारी चौंडेकर करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)