दोन दिवसांपासून सिरोंचातील ४० गावे अंधारात; राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:44 IST2025-07-10T17:35:08+5:302025-07-10T17:44:28+5:30
Gadchiroli : वीज समस्या अशीच कायम राहिल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.

40 villages in Sironcha in darkness for two days; Protest on National Highway
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गेल्या दोन दिवसांपासून सिरोंचा तालुक्याच्या ४० गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सदर ४० गावे अंधारात सापडली आहेत. दरम्यान, या प्रश्नावर आक्रमक होत नागरिकांनी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या नेतृत्वात सिरोंचा येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.
सिरोंचा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असून, या तालुक्याला लागून तेलंगणा, छत्तीसगड राज्ये आहेत. तालुक्यातील शेतजमीन सुजलाम् सुफलाम् आहे. परंतु विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्यात तब्बल १२ तासांपासून विद्युत सेवा ठप्प पडली आहे. येथील नागरिक संपूर्ण रात्र अंधारात काढत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवेदन देत समस्या मांडण्यात आल्या, परंतु अधिकारी गाढ झोपेत आहेत. तब्बल १२ तास विद्युत सेवा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. सोमवारी दुपारी ४ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीच्या कार्यवाहीला विलंब होत असतो, असा आरोप न.प. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी केला आहे.
असरअल्लीतही समस्या भारी, उपाययोजना केव्हा ?
असरअल्ली गावात दोन दिवसांपासून वीज सेवा बंद आहे. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाचे दिवस असल्याने अंधारामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हलक्याशा वादळानेसुद्धा या भागातील वीज पुरवठा अनेकदा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. या समस्यांवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीचे उत्तर
न.प. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीच्या कार्यालयात भेट दिली, परंतु त्यांनाही अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाले नाही आणि लाइट कधी येणार याची माहितीही दिली नाही. यावर रोष व्यक्त करीत बबलू पाशा यांनी शहरातील नागरिकांना घेऊन महामार्गावर चक्का जाम आंदोलन करीत तत्काळ विद्युत सेवा सुरळीत करावी व कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायत उपाध्यक्ष यांनी केली. दरम्यान, उशिराने वीज दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.