३६ उद्योग पडले बंद, पण भूखंडावर ताबा कायम ; सांगा, कसा होणार औद्योगिक विकास ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:03 IST2024-12-19T16:02:02+5:302024-12-19T16:03:36+5:30
Gadchiroli : उद्योगातील कार्यरत कामगारांचा रोजगार हिरावला

36 industries closed, but land ownership remains; how will industrial development happen?
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहराच्या जवळ कोटगल भागात असलेल्या येथील एमआयडीसीमधील अनेक भूखंड अजूनही रिकामे पडून आहेत. तसेच, उद्योजकांच्या अनेक अडचणींमुळे या एमआयडीसीतील तब्बल ३६ उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील कार्यरत कामगारांचा रोजगार हिरावला आहे. मात्र, संबंधित भूखंड अजूनही संबंधित उद्योजकांच्या ताब्यात आहेत. भूखंडावरील ताबा व्यावसायिकांनी सोडला नाही.
येथे निर्माण होणाऱ्या नव्या उद्योगांची संख्या फार कमी आहे. याउलट बंद होणाऱ्या उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीमुळे गडचिरोलीचा औद्योगिक विकास कसा होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. उद्योग बंद पडलेले भूखंड परत घेण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केंद्र व राज्य सरकार रोजगार निर्मितीसाठी व औद्योगिक विकासासाठी धोरण आखत असते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याची करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दरम्यान राज्य सरकारच्या वतीने औद्योगिक विकास करण्याच्या हेतूने प्रत्येक जिल्ह्यात एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली. दरम्यान शासकीय, तसेच खासगी जागेचे अधिग्रहण करून ही जागा उद्योजकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयी कोटगल मार्गालगत सन १९९० मध्ये एमआयडीसीची निर्मिती करून भूखंड विकसीत करण्यात आले, तेव्हापासून आतापर्यंत भूखंड उद्योजकांना वितरीत करून येथे उद्योग निर्मितीला चालना देण्यात आली. मात्र, या एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांत बोटावर मोजण्याइतके उद्योग सोडले, तर फारसे नवे उद्योगाची निर्मिती झाली नाही.
गडचिरोलीतील एमआयडीसीची स्थिती
एकूण भूखंड - १७१
बांधकामे सुरू - ३०
उद्योग सुरू आहेत - ४४
शिल्लक भूखंड - ०६
कधी दूर होणार उद्योजकांची उदासीनता?
जिल्हास्तरावरही औद्योगिक विकासाला गती नसल्याचे दिसून येते. मोठ्या शहरांमध्ये अनेक उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा मिळत नसल्याने व्यावसायिक दराची जागा खरेदी करून उद्योग उभारावा लागतो. तर, गडचिरोलीत मुबलक जागा उपलब्ध असतानाही उउद्योजक पुढे येत नसल्याचे दिसून येते. उद्योजकांची उदासीनता कधी दूर होणार, असा प्रश्न आहे.