सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:34 IST2017-12-30T23:34:13+5:302017-12-30T23:34:50+5:30
२०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.

सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश मिळाले नाही.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहूल व मागास असला तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे मागील काही वर्षांच्या गुन्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दिसून येते. २०१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ४४ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. ९१ चोऱ्या झाल्या आहेत. चार ठिकाणी मोठे दरोडे पडले आहेत. ६३ नागरिकांवर खूनाचा प्रयत्न झाला आहे. १६ ठिकाणी दंगा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. १५५ नागरिकांना अपघातांमुळे दुखापत झाली आहे. ९२ जुगार अड्ड्यांवर पोलीस विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. या धाडीमध्ये कोंबड बाजारांचा सर्वाधिक समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोंबड बाजाराच्या माध्यमातून मोठा जुगार खेळला जातो. त्यामुळे कोंबड बाजारावर पोलिसांकडून धाड टाकली जाते.
सणासुदीच्या कालावधीत कोणतीही मोठी घटना घडू नये, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना तडीपार केले जाते. २०१७ या वर्षभराच्या कालावधीत सुमारे १२ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीही तेलंगणा, छत्तीसगड राज्य नजीकच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. तडीपार केलेल्या एकूण गुन्हेगारांमध्ये दारूच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांचा समावेश अधिक आहे.
गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी
गडचिरोली जिल्ह्याचा आकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वसाधारण आहे. लोकसंख्या सुध्दा ११ लाख एवढी आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी गुन्हे घडण्याचे व त्याची नोंद होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. नक्षलचे गुन्हे सोडले तर इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. काही जिल्ह्यांच्या एका तालुक्यामध्ये जेवढे गुन्हे घडतात. तेवढे गुन्हे पूर्ण गडचिरोली जिल्हाभरात घडतात. ही येथील नागरिकांची असलेली संयमी व शांत वृत्ती दिसून येते. आजपर्यंत मोठमोठे मेळावे, मोर्चे, निदर्शने झाली आहेत. हजारोंच्या संख्येने नागरिक गोळा होतात. मात्र अपवाद वगळता विपरित घटना आजपर्यंत कधीच घडली नाही.