335 squads to prevent coronation | कोरोनाबळी रोखण्यासाठी ३३५ पथक

कोरोनाबळी रोखण्यासाठी ३३५ पथक

ठळक मुद्देजिल्हास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी प्रशासनाचे कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच त्यामुळे होणारे मृत्यू टाळता यावे यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हास्तरावर विविध कामांना सुरूवात झाली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमअंतर्गत घरोघरी भेटी देऊन माहिती घेणे व आरोग्य जनजागृतीसाठी ३३५ पथकांची निर्मिती करून त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. त्यातील जिल्हास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता गावस्तरावर काम करणाऱ्या संबंधित पथकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार ७१७ कुटुंबांना (११ लाख ३० हजार ३७६ लोकसंख्या) १५ दिवस गृहभेटीसाठी ३३५ पथकांची गरज भासणार आहे. बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यात १२ तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राव्ांरील ९० वैद्यकिय अधिकारी आणि ४८ समुदाय आरोग्य अधिकारी यांनी सहभाग घेतला. आता पुढील दोन दिवसात गावस्तरावरील पथक सदस्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका पथकामध्ये एक कर्मचारी किंवा आशा असणार आहे. जोडीला दोन स्थानिक स्वयंसेवक (यामध्ये एक स्त्री व एक पुरूष) राहणार आहे, असे तीन जणांचे पथक घरोघरी जाऊन कोविड-१९ बाबत सर्वेक्षण व जनजागृती करणार आहे. या पथकातील प्रत्येकाला ‘कोरोना दूत’ म्हणून संबोधले जाणार आहे. गावातील तसेच शहरातील स्थानिक दोन स्वयंसेवकांची निवड संबंधित सरपंच तसेच नगरसेवक करणार आहेत. जर स्थानिक स्वयंसेवक उपलब्ध झाले नाहीत तर पुन्हा आरोग्य कर्मचारी, तसेच आशांचा समावेश केला जाणार आहे. कुटुंबभेटीसाठी त्यांना आवश्यक साहित्य (थर्मामीटर, स्टीकर, मार्कर पेन, टीशर्ट, टोपी, बॅच, मास्क, सॅनिटायझर व लिखाण साहित्य) पुरविले जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांना आवाहन
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सरपंच, नगराध्यक्ष यांनी सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी लेखी पत्रांद्वारे केले आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायती व सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींना आवाहन पत्र पाठविण्यात आले आहे. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रत्येक घटकाची गरज असून आपणासह सर्व सहकारी यांना हा संसर्ग रोखण्यासाठी जीवीत हानी होवू न देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

आता कोरोनारुग्णांची संख्या रोखणे प्रशासनापेक्षा नागरिकांच्या हातात आहे. मात्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ओढवणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे वेळीच कोरोनारुग्णाचे निदान होऊन त्याच्यावर आवश्यकतेनुसार उपचार होण्यासाठी हे पथक घरोघरी जाऊन मार्गदर्शन करणार आहे. त्यांचे पहिले प्रशिक्षण असे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने झाले.

पथकाला खरी माहिती द्या- सीईओ कुमार आशीर्वाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांनी या मोहिमेत पथकाला खरी माहिती देवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी तसेच होणारे मृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. याकरीता प्रत्येक कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी हे कोरोना योध्दे घराघरात जात आहेत. या मोहिमेतून आजारी लोकांना उपचार दिले जाणार आहेत, तर जोखमीच्या पूर्वीचा आजार असलेल्यांना आवश्यक खबरदारीचा सल्लाही दिला जाणार आहे.

तीन प्रकारच्या व्यक्तींना महत्त्व
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येकाला आपल्या जबाबदाºया लक्षात आणून देणे हे उद्दिष्ट असणार आहे. यामध्ये कोरोनाबाधित नसलेली व्यक्ती, बाधित असलेली व्यक्ती व कोरोना बाधा होऊन गेलेली व्यक्ती अशा तीन वेगवेगळ्या लोकांसाठी संदेश वहन केले जाणार आहे.
आपण नेमकी कशी काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत कोरोना दूत माहिती देणार आहेत. कोरोना संसर्ग होऊ न देणे यासाठी काय-काय करावे याबाबत सविस्तर तपशिल यात दिला जाणार आहे.
कोरोनाबाधिताला घरीच विलगीकरणात ठेवले असल्यास त्यासाठी आवश्यक सूचनाही सांगितल्या जातील. तसेच ज्यांना कोरोना संसर्ग होवून गेला आहे, त्यांनी नंतर १० ते ७ दिवस विलगीकरणात काय-काय खबरदारी घ्यावी याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Web Title: 335 squads to prevent coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.