३३ हजार गॅस कनेक्शन बँकेसोबत लिंक

By Admin | Updated: December 9, 2014 22:50 IST2014-12-09T22:50:45+5:302014-12-09T22:50:45+5:30

सामान्य नागरिकांना गॅसवर दिले जाणारे अनुदान बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी गॅस कनेक्शन आधारकार्डसह बँकेसोबत लिंक करणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात

33 thousand gas connection link with the bank | ३३ हजार गॅस कनेक्शन बँकेसोबत लिंक

३३ हजार गॅस कनेक्शन बँकेसोबत लिंक

गडचिरोली : सामान्य नागरिकांना गॅसवर दिले जाणारे अनुदान बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी गॅस कनेक्शन आधारकार्डसह बँकेसोबत लिंक करणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८० हजार ३२८ ग्राहकांपैकी ३३ हजार १९५ ग्राहकांनी बँकेसोबत आधार कार्ड व गॅस कनेक्शनची लिंक जोडली आहे.
स्वयंपाक करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातीलही नागरिक आता एलपीजी गॅसचा वापर करीत आहेत. गॅस ही आवश्यक गरज बनली असल्याने शासनाकडून सर्वसामान्य व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसवर जवळपास ५० टक्के अनुदान दिले जाते. यापूर्वी ग्राहकाला अनुदान वगळून गॅस सिलिंडरची रक्कम द्यावी, लागत होती. मात्र गॅस एजन्सीधारक सदर सिलिंडरची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करीत होते. यामुळे शासनाला महिन्याला कोट्यवधी रूपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. त्याचबरोबर गरजू ग्राहकाला वेळेवर सिलिंडर मिळत नव्हते. या सर्व कटकटीपासून मुक्तता मिळविण्याबरोबरच या व्यवसायात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने गॅसवरील अनुदानाची रक्कम सरळ बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले. गॅस कनेक्शनचा क्रमांक बँक खाता व आधार कार्ड यांच्याशी जोडला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ही योजना ज्या जिल्ह्यांमध्ये आधार कार्ड काढण्याचे प्रमाण अधिक होते, अशाच जिल्ह्यांमध्ये सुरू केली. मात्र या योजनेला प्रचंड विरोध झाल्यानंतर यापूर्वीच्या केंद्र सरकारने या योजनेला स्थगिती दिली. भाजपाचे नवीन सरकार सत्तेत आले. गॅस अनुदानावरील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नसल्याने नवीन सरकारनेही जुनीच योजना स्वीकारली. त्यामुळे आता गॅस कनेक्शन बँक व आधारशी लिंक केल्याशिवाय ग्राहकांना पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६ गॅस एजन्सीज असून जिल्हाभरात ८० हजार ३२८ गॅस कनेक्शन आहेत. त्यापैकी ४९ हजार ११८ गॅस कनेक्शन आधार कार्डसोबत लिंक झाले आहेत. तर ३३ हजार १९५ गॅस कनेक्शन आधार कार्ड व बँकेच्या खात्याशी लिंक झाली आहेत. यापूर्वी बँक खात्यासोबत गॅस कनेक्शन लिंक करण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे करण्यात आले होते. मात्र अजुनही जवळपास २० टक्के नागरिकांना आधार कार्ड काढले नाही. ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले, त्यांचे आधार कार्ड आले नाही. आधार कार्डाअभावी अनुदान थांबल्यास फार मोठा गोंधळ निर्माण होईल, ही शक्यता लक्षात घेऊन आता आधार कार्डमधून सूट देण्यात आली आहे. ज्या गॅस कनेक्शनधारकाकडे आधार कार्ड नाही, अशा गॅस कनेक्शनधारकाला दोन अर्ज भरायचे असून एक अर्ज बँकेकडे तर दुसरा अर्ज गॅस एजन्सीकडे द्यायचा आहे.
काही दिवस गडचिरोली जिल्ह्यात ग्राहकाच्या बँक खात्यात गॅस अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत होती. मात्र गडचिरोली जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एखादी महिन्याच्या कालावधीनंतरच केंद्र सरकारने या योजनेला स्थगिती दिली. त्यामुळे आता सध्य:स्थितीत जुन्याच पद्धतीने सिलिंडर गॅस मिळत असली तरी लवकरच गॅसवरील अनुदान बँक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनसुद्धा कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 33 thousand gas connection link with the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.